BJP MLA Dadarao Keche On Devendra Fadanis : वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी आर्वी विधानसभा (Arvi Assembly) मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या भाजपचे दादाराव केचे (Dadarao Keche)आर्वीचे विद्यमान आमदार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) सुमीत वानखेडे (Sumeet Wankhede) यांचे आर्वी हे मूळ गाव असल्याने ते देखील या मतदारसंघात चांगलेच सक्रीय झाले.
त्यांनी मतदारांच्या समस्या सोडविण्याचा सपाटा लावताच आ. केचे यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. परिणामी आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम. पंत) येथील जाहीर सभेत त्यांनी सुमित वानखेडे यांचे नाव न घेता चांगलीच आगपाखड केली. हिरवळीवर उड्या मारू नका, आधी मतदारसंघात झटा, अशी टीका त्यांनी केली.
शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, स्वरदा बापट पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या…
यानंतर आता वानखेडे यांच्या पत्राने केचे यांच्या मतदारसंघात निधी आला आहे. यावर केचे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. आपलं पत्र नसताना दुसऱ्याच्या पत्रावर निधी देणं हा आपला घोर अपमान आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच असंच जर होत असेल तर मला नाईलास्तव आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा त्यांनी फडणवीसांना पत्राद्वारे दिला आहे.
आर्वी, आष्टा, कारंजा हे तीन भाग माझ्या मतदारसंघात येतात. आर्वी, कारंजा आणि आष्टा नगरपालिका व पंचयातसमितीसाठी मी निधी मागितला होता. आर्वी आणी आष्टीसाठी निधी दिला नाही. आष्टीसाठी 5 कोटी व आर्वीसाठी 5 कोटींच्या विकास निधीची मागणी केली होती. पण फक्त कारंजासाठी 5 कोटीचा निधी मिळाला, असे ते म्हणाले आहेत.
पिचड पिता-पुत्रापाठोपाठ अजित पवार देणार विखे पाटलांना धक्का? मोर्चेबांधणीला सुरुवात
तसेच माझं पत्र नसताना 12 एप्रिल 2023 ला निधी देण्यात आला. आर्वीचा मी दुसऱ्यांदा आमदार आहे. माझ्या पत्राशिवाय निधी देऊ नये, असे ते म्हणाले आहेत. पत्र न देता निधी दिला ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. त्यामुळेच असं असेल तर मला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आमदार म्हणून जे काम केचे यांना करता आले नाही, ते आष्टी आणि कारंजा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचे काम वानखेडे यांनी पंधरा दिवसांत मंजूर करून आणले. त्यामुळे केचे यांच्या चिंतेत भर पडली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत डावलले जाण्याची भीती आ केचे यांना सतावत असल्याने त्यांनी आता जाहीर सभेतही नाव न घेता वानखेडे यांच्यावर आगपाखड सुरू केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आ. दादाराव केचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात.