लोकसभेची सेमी फायनल असणाऱ्या देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस सत्तेत आली. या निकालानंतर देशात 9 वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) करिष्मा कायम असल्याचा दावा भाजपकडून (BJP) केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक देखील भाजप मोदींच्या चेहऱ्यावर लढविणार हे आता स्पष्ट झाले आहे. (BJP’s victory in three states will be more of a headache for Shinde and Ajit Dad’s group than Mahavikas Aghadi)
दरम्यान, तीन राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यात यश मिळवल्याने भाजपाला आता महाराष्ट्रातही स्वबळावर सत्ता काबीज करु शकतो हा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण भाजपचा विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे अन् अजितदादांच्या गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. हा विजय म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठीच धोक्याची घंटा अधिक आहे असे बोलले जाऊ लागले आहे. पण असे का तेच या व्हिडीओमधून समजून घेऊ.
सध्या महाराष्ट्रात महायुतीच सरकार आहे. यात 50 आमदार सोबत असलेले शिंदे मुख्यमंत्री, 104 आमदार पाठीशी असलेले फडणवीस आणि 45 ते 40 आमदारांच्या पाठिंब्यावर अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. हे तिन्ही पक्ष आगामी लोकसभेला एकत्र सामोरे जाणार आहेत. पण या दोन मित्र पक्षांच्या अस्तित्वाबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तीन राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपला जे यश मिळाले त्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स अजून वाढला आहे. भाजप स्वबळावर सत्ता आणू शकतो असा विश्वास भाजपाला निश्चितच आला आहे.
भाजपचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिल्या मित्र पक्षांना सोबत घ्यायचं आणि आपली ताकद वाढली की त्यांना कमकुवत करायचा असा दिसून येतो. त्यामुळे महाराष्ट्रात आणि लोकसभेला सत्ता मिळवण्यासाठी मोदी-शहा आणि फडणवीस यांनी शिंदे आणि पवारांना आता सोबत घेतले असले तरीही या निकालानंतर भाजपला शिंदे आणि अजित पवार यांची फारशी गरज नाही असे कार्यकर्ते म्हणत आहेत. 104 आमदार असूनही उपमुख्यमंत्री अन् सर्वांत कमी मंत्रिपदे ही सल आगामी निवडणुकीनंतर स्वबळावर सत्तेत येत भाजपला पुसता येऊ शकेल, असाही दावा करत आहेत. काही राजकीय जाणकार सध्याच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या अवस्थेचे वर्णन ‘गरज सर्व अन् वैद्य मरो ‘ असे करत आहेत.
या तीन राज्यांचा निकाल भाजपच्या विरोधात गेला असता तर शिंदे अन् अजितदादांची बार्गिनिंग पॉवर कमालीची वाढली असती. पण आता जागा वाटपाचे सगळे सूत्र भाजपच्याच हातात असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 26 जागा लढवेल तर मित्र पक्ष 22 जागा लढवेल. मात्र हे अद्यापही निश्चित झालेलं नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्याच्या घडीला तेरा विद्यमान खासदार आहेत तर अजित पवार यांच्यासोबत एकच खासदार म्हणजेच सुनील तटकरे आहेत. 48 पैकी 22 जागा या जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला देण्यात येणार असतील यामध्येही दोन्ही गटात रस्सीखेच पाहायला मिळेल.
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने त्यांचे प्रमाणाबाहेर कौतुक करावे लागत होते. शिंदे जनतेत वावरतात. त्यामुळे लोकप्रिय होताहेत. मराठा समाजातले असल्याने त्यांचा खूप फायदा होतो आहे, हे लक्षात घेत भाजप काहीसे नमते घेत होते. पण आता शिंदेंच्या कौतुकाला ब्रेक लागू शकतो. याचा प्रत्यय निकालाच्या दुसऱ्याच दिवशी दिसून आला. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर बोलताना बावनकुळे यांनी 2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडाऱ्यात बोलताना केला आहे.
‘भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसला आजवर गड राहिलेल्या विदर्भाने हात दिला असता. गेल्या विधानसभेत विदर्भात जागा कमी झाल्या होत्याच, पण आता विदर्भाला लागून असलेल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपला कौल मिळाला असल्याने त्याचा प्रभाव इकडेही निकालांवर पडू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. शिवाय शिवसेना फुटल्याने मराठवाड्यात लाभाची शक्यता आहेच. याच सर्व कारणांमुळे भाजपचा तीन राज्यांतील विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे अन् अजितदादांच्या गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.