Boyfriends murdered within mere hours after Family consented to daughter’s love marriage in Nashik : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या तरुण-तरुणीच्या विवाहाला कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीचे दोन भाऊ आणि तिच्या मेव्हण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खासदार वाकचौरे यांच्या दोन वर्षाच्या कारकीर्दीचा फुसका बार…
मृत तरुणाची ओळख सचिन मोतीराम चौरे (वय 25) अशी असून तो नरूळ गावचा रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि आठंबे येथील एका तरुणीमध्ये गेली आठ वर्षे प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील असले तरी या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याचे सांगितले जाते.
काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा होऊन विवाहासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर तरुणीला सचिनसोबत पाठवण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी कन्हेरवाडी येथे गंभीर घटना घडली. सोमवारी सकाळी तरुणीचे दोन भाऊ आणि मेव्हणा सचिन ज्या ठिकाणी राहत होता तेथे पोहोचल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या वादातून सचिनवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. छातीवर गंभीर जखमा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कुणाल खेमूसोबत 26 जूनपासून सुरू होणार ‘अलायन्स’, प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिॲलिटी शो
घटनेनंतर संशयित आरोपी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे समजते. दरम्यान, आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असता परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
NAFA 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “NAFA 2026” फिल्म फेस्टिव्हलला उपस्थितीची ग्वाही
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून प्रेमसंबंध, कौटुंबिक मतभेद आणि हल्ल्यामागील नेमके कारण याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे कळवण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
