बुलढाणा : येथील भीषण अपघातानंतर संपूर्ण देश हळहळला. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि देशातील विविध नेत्यांनी, लोकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करुन 26 मृत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. याशिवाय जखमींच्या आरोग्यासाठीही प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय लेन कटिंग आणि इतर नियमांचाही चालकाने भंग केला असल्याचे प्राथमिकदृष्ट्या आरटीओच्या अहवालात समोर आले आहे. (Buldhana samruddhi highway accident update police sub inspector connection)
दरम्यान, अपघातग्रस्त बसचे कनेक्शन आता थेट यवतमाळच्या एका पोलीस उपनिरीक्षकापर्यंत जाऊन पोहचले आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स क्रमांक (MH 29 BE 1819) ही प्रगती भास्कर दरणे यांच्या नावावर आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक म्हणून वीरेंद्र दरणे समोर आले आहे. मात्र बस प्रगती दरणे यांच्या नावे आहे. त्या यवतमाळ पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक भास्कर दरणे यांच्या पत्नी आहेत.
पोलिस दलात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ट्रॅव्हल्स लांब पल्ल्यावर धावत असल्याची चर्चा 2 वर्षापूर्वी समोर आली होती. त्यावरून मोठे वादळही निर्माण झाले होते. आता विदर्भ ट्रॅव्हल्सच्या निमित्ताने या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहे. वीरेंद्र आणि भास्कर हे दरणे बंधू मिळून ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सांभाळत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
बसबाबत बोलताना वीरेंद्र दरणे म्हणाले, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स 2020 मध्ये खरेदी केली होती. वीरेंद्र दरणे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. कोरोना लॉकडाउन काळात ट्रॅव्हल्स वर्षभर उभीच होती. फिटनेस प्रमाणपत्र असल्याचे आणि चालक प्रशिक्षित होता, असाही दावा संचालक दरणे यांचा आहे. कारंजा येथे गाडीचे चालक बदलले होते. चालक अनुभवी व निर्व्यसनी आहे. गाडीचे टायर नवीनच होते, अशीही माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अपघातानंतर समृद्धी महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. समृद्धी महामार्ग पूर्णतः सुरक्षित आहे. आतापर्यंत जे काही अपघात घडले, त्यात कुठेही रस्त्याच्या बांधकामामुळे घटना घडल्याचं कुठेही निदर्शनास आलेलं नाही. कुठे मानवी चुका तर कुठे वाहनाची तांत्रिक कारण समोर आली आहेत. पण आम्ही अशा घटना टाळण्यासाठी पावले उचलत आहोत. आम्ही कॅमेरे आणि स्मार्ट सिस्टीम बसवण्याचा विचार करत आहोत, पण त्यासाठी वेळ लागेल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला क्लिनचीट दिली.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बस डिव्हायडरला धडकून डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने 8 जणांचा जीव वाचला असून ते सर्व किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.