आमदार नसताना देखील सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होऊ शकतात का, कायदा काय सांगतो?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर एकमत दर्शवले आहे.

Untitled Design (346)

Untitled Design (346)

 Sunetra Pawar become Deputy CM without being an MLA? : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या आणि वेगवान घडामोडींना सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर एकमत दर्शवले आहे. त्यामुळे त्या लवकरच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेत्याच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा अधिकृत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास 31 जानेवारी रोजी शपथविधी पार पडू शकतो, अशी माहिती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

अजित पवारांनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदावर सविस्तर चर्चा झाली असून, त्यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे त्या आमदार नसताना थेट उपमुख्यमंत्री कशा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र भारतीय संविधानानुसार यासाठी स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे.

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाईल. मुख्यमंत्री हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवतील. त्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाईल.

शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्र विधानसभा किंवा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची आवश्यकता असेल. विधानसभा सदस्य होण्याचा निर्णय झाल्यास अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि ती निवडणूक सुनेत्रा पवार यांना लढवावी लागेल.

तर विधानपरिषदेवर जाण्याचा निर्णय झाल्यास अजित पवार गटातील एका आमदाराला राजीनामा द्यावा लागेल. त्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली जाईल.

एकूणच अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जलद हालचाली सुरू केल्या असून, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Exit mobile version