Car catches fire after heavy impact : रस्त्यावरील बेजबाबदार आणि भरधाव वेगाने आणखी एका निष्पाप कुटुंबाचा बळी घेतला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. भरधाव टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कारने क्षणार्धात पेट घेतल्याने माय-लेकाचा जळून जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कापसी फाट्यावर घडली.
मृतांमध्ये ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी (वय 42) आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय 25) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा पुरी आणि ऋषिकेश पुरी हे दोघे कारने आष्टीहून बीडकडे निघाले होते. कापसी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या भरधाव आणि अनियंत्रित टिप्परने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि काही क्षणातच कारने पेट घेतला.
आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने कारमधील दोघांनाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. दरवाजे अडकून पडल्याने माय-लेक आगीत अडकून पडले आणि जिवंत जळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कारची झालेली अवस्था आणि लागलेली आग यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
विरोधकांचा दबाव आणि पक्षांतर्गत नाराजी वाढली, अखेर रुपाली चाकणकरांनी सोडली दोन्ही पदे
मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये अडकले असल्याने तब्बल दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर कटरच्या सहाय्याने गाडी कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, मृत ऋषिकेशचे वडील श्रीहरी पुरी हे ग्रामसेवक असून एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. अपघात घडत असतानाच ते एका ठिकाणी हरिनामाच्या कीर्तनात तल्लीन झाले होते. कीर्तन सुरू असतानाच त्यांच्या कुटुंबावर काळाने असा घाला घातल्याची बातमी समजताच उपस्थितांमध्ये शोककळा पसरली.
या भीषण अपघातामुळे आष्टी तालुका आणि संपूर्ण बीड जिल्हा हळहळला आहे. दरम्यान, भरधाव आणि बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या जड वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
