दफनविधीहून परतताना कार विहिरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्यू

या अपघातात सुलताना बेगम जियाउल्लाखान यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर अकतरबी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

News Photo   2026 08 08T161257.244

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात (Jalna) पारध-वालसावंगी मार्गावरील पद्मावती गावाजवळ भरधाव कार रस्त्यालगतच्या सुरक्षा कठडा नसलेल्या विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, कारमधील दोन पुरुषांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आले.

धावडा येथील रहिवासी सुलताना बेगम जियाउल्लाखान (वय 47), अकतरबी (वय 75), अबुताला जियाउल्लाखान (वय 22) आणि अल्तामश खान हे चौघे सावंगी अवघडराव येथे नातेवाईकाच्या दफनविधीसाठी गेले होते. दफनविधी आटोपल्यानंतर ते कारने धावडा गावाकडे परतत होते.

‘वहिनीसाहेब, साहेबांना सांगा; सुरेश धसांची अमृता फडणवीसांकडे बीडसाठी मोठी मागणी

दरम्यान, पारध-वालसावंगी मार्गावर पद्मावती गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी दोन पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या अपघातात सुलताना बेगम जियाउल्लाखान यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर अकतरबी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रात्रीच्या वेळी कार विहिरीतून बाहेर काढण्यात अपयश आले होते. आज कार विहिरीबाहेर काढण्यात आली.

follow us