…तर दुष्काळच पडला नसता, शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर भाजप मंत्री जयकुमार गोरेंचा टोला
Jayakumar Gore criticizes Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दुष्काळी परिस्थिती पाहणी दौऱ्यावर भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची टीका.
Jayakumar Gore criticizes Sharad Pawar : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून (Drought) पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50 टक्केच पाऊस झाला असून अनेक भागांत खरीप पिकं वाया जाण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक झाली. पिण्याचं पाणी, शेतीसाठी पाणी, जनावरांचा चारा आणि टँकरची व्यवस्था याबाबत प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या 80 टक्के पिकांचं नुकसान झालं असून पुढच्या 15 दिवसांत पाऊस पडला नाही, तर नुकसान 100 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं, असं गोरे यांनी सांगितलं.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार 28 सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. याबाबत जयकुमार गोरे यांना विचारलं असता, “अशा अनुभवाचा फायदा झाला असता तर राज्यात दुष्काळच पडला नसता,” असा टोला त्यांनी पवारांना लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सध्या अनेक कामं सुरू असल्याचं सांगत, ही कामं आधी झाली असती तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असंही गोरे म्हणाले. याआधी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासोबतच शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.
सोलापुरातील पाणीटंचाई लक्षात घेता उजनी धरणातील पाण्याचं नियोजन करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. सध्या 68 गावांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू असून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन वर्षभरासाठी पाणी राखीव ठेवण्याचं नियोजन सुरू असल्याचं गोरे यांनी सांगितलं. परतीचा पाऊस 15 ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित असला तरी त्याची वाट न पाहता पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही ठरावीक निकष असून 5 ऑक्टोबरपर्यंतची प्रक्रिया त्यासाठी महत्त्वाची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात 34 टँकर सुरू असल्यावरून केलेल्या टीकेलाही गोरेंनी उत्तर दिलं. आपल्या मतदारसंघात टँकर सुरू असून त्याकडे लक्ष असल्याचं सांगत, मोहिते पाटील यांनीही त्या भागाचा दौरा करावा, असा टोला त्यांनी लगावला. दुसरीकडे, पंचनामे होण्याआधी शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असं आवाहन गोरेंनी केलं. काही भागांत आता पाऊस पडला तरी फारसा फायदा होणार नसला, तरी काही ठिकाणी परतीचा पाऊस पडल्यास पिकं पुन्हा उभी राहू शकतात. त्यामुळे पंचनामे होईपर्यंत शेतकऱ्यांनी पिकं नष्ट करू नयेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.