देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात लातूर कनेक्शन अधिक गडद होत असून, सीबीआयने आज शहरातील हालचाली पुन्हा वाढवल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये (Latur) कारवाईला सुरुवात झाली होती. त्यानंतर दिवसभर सुतमील परिसरातील एका खासगी ट्युशन चालकाच्या घरी तब्बल अकरा तास तपासणी केल्यानंतर आता आज दुपारपासून त्याच ट्युशन संचालकाच्या कार्यालयातही सीबीआयचे पथक तपास करत आहे.
सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई अधिक महत्त्वाची मानली जात आहे. शुक्रवारी पहाटेपासून सीबीआयचे अधिकारी संबंधित ट्युशन चालकाच्या निवासस्थानी दाखल झाले होते. घरातील कागदपत्रे, मोबाईल, संगणक तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पथकाने ट्युशन चालणाऱ्या ठिकाणी जाऊनही विविध माहिती आणि नोंदी गोळा केल्याची माहिती समोर आली होती.
आज दुपारपासून पुन्हा सीबीआयचे एक पथक त्या ट्युशनच्या कार्यालयात तपास करत असून, या संपूर्ण कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात येत आहे. नांदेड आणि लातूर पोलिसांचा बंदोबस्त तसेच सीबीआयचे अधिकारी या तपासात सहभागी असल्याची माहिती आहे. संबंधित ट्युशनचालक लातूरमध्ये आहे का नाही याबाबत कोणतीही माहिती समोर येताना दिसत नाही. शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या तपासानंतर सीबीआयचे पथक काही कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती सोबत घेऊन निघून गेले होते.
या कारवाईत नेमके काय हाती लागले, पुढील कारवाई काय होणार किंवा कोणावर गुन्हा दाखल होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. NEET पेपरफुटी प्रकरणातील लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवली असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नीट पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने आत्तापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये, नाशिकमधून शुभम खैरनार, तर अहिल्यानगरमधूनही तरुणास अटक केली आहे.
पुण्यातूनही एका प्राध्यापक महिलेसह ब्युटी पार्लर चालक महिलेलाही पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे. लातूरमधून रसायनशास्त्राचा माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून ताब्यात घेतले. कुलकर्णी याला थेट प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश (Access) होता आणि त्यानेच एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात आपल्या नेटवर्कद्वारे प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप आहे.
