NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; संशयित कुटुंबाची 8 तास चौकशी

विद्युत नगर भागातील आशा रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कदम कुटुंबियाच्या घरी काल शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सीबीआयचं पथक धडकलं.

News Photo   2026 05 17T200345.965

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा (Exam) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या एका विशेष पथकाने काल शनिवारी नांदेडमध्ये धडक कारवाई केली. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विद्युतनगर भागातील एका संशयित कुटुंबाच्या घरावर छापा टाकत सीबीआयने तब्बल 7 ते 8 तास कसून चौकशी केली.

धक्कादायक म्हणजे सदर कुटुंबीय आपल्या मुलीसाठी लाखो रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. याच संशयावरुन सीबीआयच्या पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईमुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.नीट पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील पुणे, लातूर आणि नाशिक कनेक्शन असल्याचं समोर आलं. सीबीआयनं अनेकांना ताब्यात घेतलं. सीबीआयकडून कसून चौकशी केली जात आहे.

याचदरम्यान विद्युत नगर भागातील आशा रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कदम कुटुंबियाच्या घरी काल शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सीबीआयचं पथक धडकलं. जवळपास 7 ते 8 मुलींसह कुटुंबाची कसून चौकशी केली. कुटुंबातील सदस्यांची वेगवेगळ्या खोलीत बसवून तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. हा पेपर खरेदी करण्यासाठी आर्थिक व्यवहार कसा झाला? याचे मध्यस्थ कोण होते? आणि हा पैसा कुठून आला? याबाबींवर सीबीआयने प्रश्नांची सरबत्ती केली. महत्वपूर्ण कागदपत्राची बारकाईने तपासणी देखील केली.

नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबातील एका मुलीने यंदाची नीट परीक्षा दिली होती. या मुलीला परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी चक्क 5 लाख रुपये देऊन नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे नांदेडमध्ये तयारी करत असताना विद्यार्थिनीला 100 ते 120 गुण मिळत होते. त्यानंतर ती परीक्षेच्या 15 दिवसापूर्वी पुणे येथे तयारीसाठी गेल्याची माहिती आहे. तिथे तिला सरावामध्ये 560 गुण मिळाले.

ही बाब उघडकीस आल्यानंतर सीबीआयने कुटुंबियांची चौकशी केली. या कारवाईदरम्यान सीबीआयच्या पथकाने घरातून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याची विश्वासनीय माहिती आहे. नीट पेपरफुटीचं रॅकेट आंतरराज्यीय स्तरावर पसरलेलं असताना, आता नांदेडमधील या कारवाईमुळे या रॅकेटचं कनेक्शन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांशी आणि मोठ्या एजंट्सशी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

follow us