बलात्कार नंतर हत्या, आरजी कार प्रकरणात सीबीआयने दाखल केले आरोपपत्र
RG Kar Case : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या कोलकाता येथील आरजी कार मेडिकल (RG Kar) कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज सीबीआयने (CBI) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयने पीडित डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली.
आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे की, स्थानिक पोलिसांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या रॉयने 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. मात्र सीबीआय आरोपपत्रात सामूहिक बलात्काराच्या आरोपाचा उल्लेख केलेला नाही. रात्रीच्या जेवणानंतर पीडित डॉक्टर हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये विश्रांतीसाठी गेली असता आरोपीने हा गुन्हा केला असं सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
सीबीआयने आरोपपत्रात 200 लोकांचे जबाब नोंदवले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्य आरोपीसह कोणाचा सहभाग होणार का? याबाबात देखील सीबीआय तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. तसेच या घटनेचा देशभरात निषेध करण्यात आला होता. तर कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.
तर दुसरीकडे महिला डॉक्टरांना न्याय आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ज्युनियर डॉक्टरांचे आमरण उपोषण सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.