लाडकी बहीण योजना बंद होणार? ‘त्या’ चर्चांना CM फडणवीसांचा फुलस्टॉप!

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेबाबत गोंधळाचं वातावरणही कायम आहे. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे. यासाठी पडताळणी सुरू झाली आहे. यानंतर कागदपत्रे आणि अन्य महत्वाच्या निकषांवर तपासणी होणार आहे. तर दुसरीकडे या योजनेतून पाच लाख लाभार्थी कमी झाले आहेत. योजना बंद होणार असल्याच्याही चर्चा अधूनमधून होत असतात. या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना मिळाले 450 कोटी; धक्कादायक माहिती उघड..

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी करणाऱ्या वीस महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी महिलांनी आपली व्यथा मांडली. लाडकी बहीण योजना आमच्यासाठी आर्थिक मदत नाही तर जगण्याचा आधार आहे असे या महिलांनी सांगितले. यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी या महिलांना दिले.

फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. यापेक्षा अधिक मदत काय करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत. सन्मान निधी म्हणून मिळणारे 10 हजार रुपये दरवर्षी मिळत राहावेत अशी विनंती या महिलांनी केली. या मागणीचा नक्कीच विचार करू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर 40 ते 45 हजार कोटी रुपयांचा भार बजेटवर पडला आहे. त्यामुळे फिस्कल स्पेस कमी झाली आहे. तरी सुद्धा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. ज्या योजना सुरू आहेत त्या चालवणार आहोत. 25 हजार कोटींचा फरक पडत असेल तर केंद्रांकडून विविध योजनांतून निधी आणता येईल का याचाही विचार आम्ही करत आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आमच्या अधिकारांवर गदा येतीये काहीतरी मार्ग काढा; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सीएम फडणवीसांसमोरच..

कोणतीही योजना बंद करणार नाही

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, शिवभोजन थाळी या योजना बंद करण्याचंही काही कारण नाही. अनेकदा बातम्या आल्यानंतर कळतं की आम्ही असा काही निर्णय घेणार आहोत. परंतु, आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही. या योजनांचा आढावा घेत आहोत. लाडकी बहीण योजनेत काही अपात्र बहि‍णींनीही लाभ घेतला आहे. ही संख्या 10 ते 15 लाखांपर्यंत जाऊ शकते. परंतु, ज्यांच्या लक्षात आलं की आपण या योजनेसाठी पात्र नाही तर त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ नाकारण्यास सुरुवात केली आहे.

अपात्र लाभार्थी आहेत त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण आम्हालाही कॅगला उत्तर द्यावे लागते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून योजनेत अपात्र ठरणाऱ्या महिलांना येथून पुढे पैसे मिळणार नाहीत ही गोष्ट अधोरेखित झाली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे. लाभार्थी अपात्र असल्याचे दिसून येताच त्यांचे नाव वगळण्यात येत आहे.

Exit mobile version