मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडाने शिंदेंची शिवसेना (Shivsena) कमालीची अस्वस्थ झाली आहे. या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नाराज आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीत मंत्रिपदावरुन चर्चा सुरु असताना, अचानक काही आमदार एकमेकांना भिडले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर मंत्रिपद मिळत नसल्याने ही अस्वस्थता इतकी टोकाची होती की आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही अंगावर धावून गेले असा दावा, शिवसेना (UBT) खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. (cm Eknath Shinde meeting on varsha bungalow with unhappy Shivsena MLA for ministerially)
अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदेंच्या राजीनाम्याची अफवा, बंडातील नैतिकता, अजितदादांवरील निधीचे आरोप, मंत्रिपदाची घटलेली संख्या आणि मतदारसंघांची चिंता असे अनेक प्रश्न शिंदेंच्या शिवसेना आमदारांच्या पुढे उभे राहिले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी, चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्याची मागणी आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यकडे केली होती. यानंतर नागपूर दौरा अर्धवट सोडून शिंदे मुंबईत परतले. त्यानंतर वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली.
मात्र या बैठकीत शिंदेंचे आमदार मंत्रिपदावरुन एकमेकांना भिडले असल्याचे सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या येण्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या रिक्त जागांची संख्या कमी झाली आहे. आता केवळ 14 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात राष्ट्रवादीतील आणखी काही आमदारांना सामवून घेतलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मंत्रिपदाचा आकडा घटल्याची तक्रार आमदारांनी शिंदेंना केली. यावर मंत्रिपदही दिली जाणार आहेत, असं आश्वासन शिंदेंनी मंत्र्यांना दिलं. मात्र ती कशी आणि कधी याबाबत त्यांनी मौन पाळलं होतं.
यानंतरच मंत्रिपद मिळण्यासाठी शिवसेनेचे आमदार एकमेकांमध्ये भिडले असल्याचं सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, संजय राठोड यांची मंत्रिपद काढून घेऊन आम्हाला मंत्री करावं अशी मागणी संजय शिरसाट आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याच झटापटीत काही आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही धावून गेले असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने शिवसेनेच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याच्या किंवा मुख्यमंत्री शिंदेंच्या अंगावर आमदार धावून गेल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं. केवळ ऐकीव गोष्टीवर अशा बातम्या पेरल्या जात आहेत. या बातमीत कोणतेही तथ्य नाही. या उलट शिवसेना आमदार, खासदारांची बुधवारी झालेली बैठक अतिशय उत्तम वातावरणात झाली, असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं.