Cockroach Janata Party Protest : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात (CJP) कॉकरोच जनता पार्टीकडून मुंबईत पुन्हा आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी दादर येथील शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याचं नियोजन करण्यात आलं असून यासाठी मुंबई पोलिसांकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे. सीजेपीच्या राष्ट्रीय संघटना प्रभारी अजिंक्य शिंदे यांच्या वतीनं शिवाजी पार्क पोलिसांना याबाबत पत्र देण्यात आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार अजिंक्य शिंदे यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय संघटना प्रभारीपदाची जबाबदारी आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजातील कथित त्रुटी आणि कारभाराच्या पद्धतीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आंदोलनाचं स्वरूप संविधानिक आणि शांततापूर्ण राहणार असल्याचंही सीजेपीकडून पोलिसांना कळवण्यात आलं आहे. त्यामुळे आंदोलनासाठी आवश्यक असलेल्या पोलीस परवानगीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कॉकरोच जनता पक्ष आक्रमक, निवडणूक आयुक्त ज्ञानेश नवं टार्गेट, आंदोलनाची घोषणा करणार?
कॉकरोच जनता पार्टीने यापूर्वीही विविध मुद्द्यांवर आंदोलनं केली आहेत. ऑगस्टमध्ये पक्षाने राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत अजिंक्य शिंदे यांची राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर पक्षाकडून देशभर संघटनात्मक विस्तार आणि विविध सार्वजनिक प्रश्नांवर आंदोलनं करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
आता निवडणूक आयोगाच्या कारभाराचा मुद्दा घेऊन सीजेपी मुंबईच्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनासाठी पोलिसांची अंतिम परवानगी मिळते का, याकडे लक्ष लागलं आहे. परवानगी मिळाल्यानंतर आंदोलनाची पुढील रूपरेषा आणि सहभागींची माहिती सीजेपीकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
