Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra) थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळत होतं. शहरी भागासह गावातही थंडी गायब झाली होती. आता नवीन वर्षाला सुरुवात होताच पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे. गायब झालेली थंडी आता हळूहळू वाढू लागली आहे. शहर आणि परिसरात मागील पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. नववर्षाला प्रारंभ होताच तो कडाका वाढल्याचं दिसतय.
Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी
राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून थंडी गायब झाली होती आणि तापमानात वाढ झाली होती. फक्त पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा पाहायला मिळत होता आणि दिवसा उन्हाची झळ बसत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवेत गारवा पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला शुक्रवारपासून पुढील पाच ते सहा दिवस थंडी वाढणार आहे.
किमान तापमानात घसरण
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवणार असल्याचे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितलं आहे. उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत आहे.
थंडीचा जोर वाढणार
दरम्यान, राज्यात 3 जानेवारीपासून पुढील पाच दिवसासाठी राज्यात थंडी जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे. तसेच, नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी वर्तवला होता. 1 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.