‘सामना’तून काँग्रेसला कानपिचक्या; छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपूची तुलना पुन्हा चर्चेत

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Untitled Design 48

Untitled Design 48

Comparison between Chhatrapati Shivaji Maharaj and Tipu : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कानपिचक्या दिल्या आहेत. सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपने देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर टीका केली आहे. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने सपकाळ यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील मूलभूत फरक अधोरेखित केले आहेत.

सामनाच्या अग्रलेखातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:

1) तुलना अयोग्य असल्याचा दावा

अग्रलेखात म्हटले आहे की, टिपू सुलतानला छत्रपतींच्या समकक्ष मानणे चुकीचे आहे. अशा वक्तव्यामुळे भाजपला राजकीय संधी मिळाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या तुलनेवर टीका करत ती निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

2) संघर्षाची पार्श्वभूमी वेगळी

लेखात नमूद केल्याप्रमाणे, टिपू सुलतान हा म्हैसूरचा वारसाहक्काने गादीवर आलेला शासक होता. त्याने ब्रिटिशांविरुद्ध लढाया केल्या, मात्र त्या स्वतःचे राज्य टिकवण्यासाठी होत्या. त्याउलट, छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य उभे केले आणि मोगल आक्रमणांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले, ही बाब विशेषत्वाने मांडण्यात आली आहे.

मोठी बातमी : अहिल्यानगरमधील तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात? एटीएसची छापेमारी, अनेकांकडे चौकशी

3) युद्धातील भूमिका

टिपू सुलतानचा मृत्यू 4 मे 1799 रोजी श्रीरंगपट्टणम येथे ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत झाला. काही इतिहासकार त्यांना इंग्रजांविरुद्ध लढणारा प्रारंभीचा स्वातंत्र्यसैनिक मानतात. मात्र अग्रलेखात टिपूवर हिंदूंवर अत्याचार, जबरदस्ती धर्मांतरे आणि मंदिरे पाडल्याचे आरोप असल्याचा उल्लेख करत त्यावरून समाजात वाद होत असल्याचे म्हटले आहे.

4) आधुनिक लष्करी सुधारणा

टिपू आणि त्याचे वडील हैदरअली यांनी लष्करात आधुनिकता आणली, रॉकेट तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला, असेही लेखात नमूद आहे. तरीही छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य हे जगात वेगळे ठरले, असा दावा करण्यात आला आहे.

5) नैतिकता आणि व्यक्तिमत्त्वाचा मुद्दा

अग्रलेखात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गोरक्षक, ब्राह्मणप्रतिपालक आणि स्त्रीसंरक्षक’ म्हणून गौरवण्यात आले आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठविल्याचा संदर्भ देत त्यांच्या चारित्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याउलट टिपू सुलतानवर काही गंभीर आरोपांचा उल्लेख करत तुलना अयोग्य असल्याचे ठाम मत व्यक्त करण्यात आले आहे.

6) राजकीय आणि धार्मिक संदर्भ

टिपू सुलतानला पाकिस्तानात ‘नायक’ मानले जाते, असा उल्लेख करत भारतातील राजकारणात त्यांचे समर्थन करणे योग्य नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे. यावरून हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला आहे.

एकूणच, शिवसेनेने ‘सामना’च्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना ऐतिहासिक, नैतिक आणि राजकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version