मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असे दिसून आल्यानेच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडे (BJP) सध्या नेते नाहीत व स्वतःचे उमेदवारही नाहीत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेसुद्धा काँग्रेसमध्येच (Congress) तयार झालेले प्रोडक्ट आहेत, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला. (Congress state president Nana Patole targeted the BJP through a leaflet.)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला आणि मुलगी, आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर होती अशा केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने अशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे म्हणत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांचा दावा खोडून काढला. तर नाना पटोले यांनी काँग्रेसवर निशाणा साधत स्वतःचे नेते नाहीत व उमेदवारही नाहीत, असा टोला लगावला.
नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यातून व केंद्रातूनही सत्तेच्या बाहेर जाण्याची वेळ आली आहे. 10 वर्षात केवळ घोषणाबाजी, जाहिरात बाजी आणि खोटेपणा करून सत्ता चालवली. जनतेला आता भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे दिसले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असे भाजपाच्याच सर्वेत दिसून आल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, त्यांना पराभव दिसू लागला आहे, महाराष्ट्रातून निवडून कसे यायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे.
भाजपाकडे विचारसरणी राहिलेली नाही, काहीही करून सत्ता मिळवणे व सत्तेतून जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटायचे एवढीच त्यांची विचारधारा राहिली आहे, देश विकून देश चालवला जात आहे. काँग्रेसचे लोकनेते भाजपात कसे येतील यासाठी ते प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच त्यांना भाजपाने ऑफर दिली होती असे जाहीरपणे सांगितले आणि ते काँग्रेस सोडून जाणार नाहीत हेही स्पष्ट केले आहे. भाजपाला सत्तेचा मोह किती झाला आहे याचे दर्शन यातून होते. भाजपाकडे सध्या स्वतःचे नेते नाहीत व उमेदवारही नाहीत, त्यांच्या पक्षात काँग्रेस व इतर पक्षातीलच अनेक नेते आहेत. भाजपाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा युवक काँग्रेसमध्ये होते, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यावेळी गुजरातमध्ये होत आहे, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्रातून काही ना काही गुजरातला घेऊन गेले. ते देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे? याआधी महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला घेऊन गेले. काल परवा आले आणि मुंबईतील ग्लॅमर असलेला फिल्म फेअर सोहळाही गुजरातला घेऊन गेले. महाराष्ट्र लुटला जात आहे आणि राज्यातील हस्तक गुजरात लॉबी सांगेल त्याप्रमाणे वागत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.