मुंबई : राज्यातील नागरिकांना आपात्कालीनवेळी ‘108’ रुग्णवाहिकेची (108 Ambulance) सेवा देण्याचे कंत्राट अखेर भारत विकास ग्रुप (BVG), एसएसजी कंपनी आणि सुमित एंटरप्रायझेस या कन्सोर्टियमला देण्यात आले आहे.सरकारने पुढील दहा वर्षांसाठी या कन्सोर्टियमला 10 हजार कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. मात्र गतवेळच्या कंत्राटपेक्षा यंदाच्या कंत्राटची रक्कम तब्बल तीनपट वाढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचाही आरोप होत आहे. (contract to operate 108 Ambulance has finally given to a consortium of Bharat Vikas Group (BVG), SSG Company and Sumit Enterprises.)
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 2014 पासून 108 रुग्णवाहिकेची सेवा दिली जाते. आतापर्यंत 94 लाख रुग्णांना या रुग्णवाहिकेने आपात्कालीनवेळी सेवा दिली आहे. तर 40 हजार बालकांचा रुग्णवाहिकेतच जन्म झाला आहे. त्यामुळे गर्भवती महिला, अपघातग्रस्त आणि वैद्यकीय आणीबाणीवेळी या रुग्णवाहिका देवदूत ठरल्याचे दिसून आले आहे. आताही पुढील 10 वर्षांसाठी या रुग्णवाहिकेची सेवा मिळणार आहे. मात्र कंत्राटाचा तीनपट वाढलेला खर्च सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
जानेवारी 2014 ते जानेवारी 2024 या दहा वर्षांत सरकारने प्रतिवर्षी चारशे कोटी म्हणजे दहा वर्षात साधारण चार हजार कोटी खर्च करुन रुग्णवाहिकेची सेवा दिली होती. बीव्हीजीकडे या रुग्णवाहिका संचालनालाचे कंत्राट होते. मात्र आता पुढील दहा वर्षांसाठी भारत विकास ग्रुप, स्पेनच्या एसएसजी आणि सुमित एंटरप्रायझेस या कंपन्यांच्या कन्सोर्टियमला तब्बल 10 हजार कोटींना करारबद्ध करण्यात आले आहे. याचमुळे गतवेळीपेक्षा जवळपास सहा हजार कोटींनी नव्या कंत्राटच्या रकमेत वाढ झाली आहे.
आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनीही या निविदा प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. कोणताही कायदा, नियम व संकेत यांना न जुमानता ही निविदा मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याशिवाय या निविदा प्रक्रियेतील त्रुटी आणि अनियमितता पहाता कोणाला तरी डोळ्यांसमोर ठेऊन आणि मोठ्या राजकीय नेत्याच्या हितासाठी ती राबवली जात असल्याचा आरोप होत होता तो खरा ठरल्याचे दिसते, असाही दावा त्यांनी केला.
अखेर कोणताही कायदा, नियम व संकेत यांना न जुमानता आपत्कालिन ॲम्ब्युलन्स सेवेची १० वर्षात १० हजार कोटी रूपयांची खर्चाची एकमेव निविदा सुमित, बिव्हिजी आणि स्पेनच्या एसएसएस या कंपन्यांच्या कन्सोर्टीयमला मंजूर करण्यात आली.या निविदा प्रक्रियेतील त्रुटी आणि अनियमितता पहाता कुणाला तरी… pic.twitter.com/uA5Cek6WRH
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) February 16, 2024
यापूर्वी बीव्हीजी कंपनीच्या 937 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत होत्या. मात्र, यापुढे 1 हजार 756 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहे. सध्या ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट आणि बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात 108 रुग्णवाहिकेची सेवा पुरवली जाते. कंपनीकडून या रुग्णवाहिकांच्या संख्येत वाढ करण्यासोबतच नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत.
सोबतच समुद्र आणि नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने 36 बोट रुग्णवाहिका विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये नव्याने तैनात होणार आहे. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने 108 क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्ण वाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे. शिवाय जलदगतीने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. एका बाजूला हे फायदे असतानाच सरकार करणार असलेल्या खर्चावरही टीका होत आहे.
आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे आठ हजार कोटींचे कंत्राट यापूर्वीही म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये निघाले होते. मात्र काही कारणाने ते रद्द करण्यात आले. त्यानंतर जानेवारी महिन्यात नव्या अटी शर्तींसह नव्याने कंत्राट काढण्यात आले. पण ते भरण्यासाठी अवघ्या 7 दिवसांची (4 जानेवारी ते 13 जानेवारी) मुदत देण्यात आली होती.
इतकी मोठी निविदा एवढ्या कमी कालावधीत कोण आणि कसे भरणार? या निविदेला पुरेशी प्रसिद्धी का दिली नाही? केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार, कंत्राटदारांमध्ये स्पर्धा होऊन कामाचा दर्जा वाढावा यासाठी निविदा भरण्यासाठी किमान 21 दिवसांची मुदत देण्यात यावी. मात्र हा नियम बाजूला ठेवून केवळ सात दिवसांचीच मुदत का देण्यात आली? असे सवाल करत या कंत्राटावर आक्षेप घेण्यात आले होते.
त्यानंतर सरकारने पुढील कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत भारत विकास ग्रुपला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. आता भारत विकास ग्रुप, एसएसजी कंपनी आणि सुमीत एंटरप्रायझेस या कन्सोर्टियमला दहा वर्षांसाठीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र नियमित खर्चापेक्षा या कराराची रक्कम तब्बल तीनपट वाढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.