Download App

बाबासाहेबांचे विचार सर्वदुर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा;अजितदादांकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन

बाबासाहेबांचे विचार सर्वदुर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलंय.

Dcm Ajit Pawar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलंय. दरम्यान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना स्मरण करुन अभिवादन करत जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी या देशातील अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेदासारख्या कुप्रथांविरुद्ध निर्णायक लढा दिला. या देशातील माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क केवळ त्यांच्यामुळे मिळाला. समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं, असल्याचं पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंचा फोन…भरत गोगावले तातडीने मुंबईला रवाना, पडद्यामागं नेमकं घडतंय काय?

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम ठेवण्याचं काम केलं. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेनं गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकाला एका मताचा समान अधिकार दिला. प्रत्येक देशवासियाला मानानं, स्वाभिमानानं जगण्याचा हक्क आणि विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे,” असेही अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

बाबासाहेबांचा विचार पुढे नेणं हेच खरं अभिवादन – पवार
डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करणं हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम डॉ. बाबासाहेबांनी केलं. त्यांच्यासारखे महामानव आपल्या देशात जन्मले, त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते.

लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार होते. डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका; हे सारं देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचावेत; त्यातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम रहावी. एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया,” असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात केलं आहे.

follow us