स्नेहल जगताप यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र; राष्ट्रवादी अजित पवार गटात आज प्रवेश

स्नेहल जगताप यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र; राष्ट्रवादी अजित पवार गटात आज प्रवेश

Snehal Jagtap joins NCP Ajit Pawar faction : महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (NCP ) ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी अखेर शिवसेना ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. काही दिवसांपासून त्या भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली होती.

Video : कोकणात ठाकरेंची ताकद वाढविणाऱ्या स्नेहल जगताप कोण?

अखेर जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे. नुकतेच स्नेहल जगताप यांचं कुटूंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांच्यामध्ये बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यात आता स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र कोकणात परत एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

भरत गोगावले अडचण होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत येथे हा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्नेहल जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत भेट घेऊन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्नेहल जगताप सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे. शिवाय जगताप यांची भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे.

एकीकडे भरत गोगावले यांच्याशी पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे यांचे वाद सुरू असताना दुसरीकडे तटकरे यांच्याकडून भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने नवा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ठाकरे सेनेला रायगडात पुन्हा एकदा खिंडार पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. सोबतच भरत गोगावले यांची आता डोकेदुखी देखील वाढणार असल्याचे सांगितलं जातंय.

कोण आहेत स्नेहल जगताप?

स्नेहल जगताप या महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या आहेत. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत स्नेहल माणिकराव जगताप यांना 91, 232 तर भरत गोगावले यांना 1,17,442 मते मिळाली. या निवडणुकीत 26, 210 मतांनी गोगावले यांचा विजय झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube