Deepak Kesarkar On Teachers Recruitment : राज्यभरात पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teachers Recruitment)केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी दिली आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशन (Aadhaar Verification) विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबतची आकडेवारी समजेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे-गौरव बापट भेट, भाजपचा पुण्याचा उमेदवार ठरला?
शिक्षक भरतीबद्दल मंत्री केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशीन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबत आकडा समजेल. यावेळी 100 टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे, कारण आरक्षणानुसार ही पदभरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या बदलीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थीर होतील, याबद्दल महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसेच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी सांगितलं आहे.
शिक्षकांची बदली न झाल्यास एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असंही दीपक केसरकर म्हणाले.