Dhananjay Munde’s big statement is in the news : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील मराठा भवन भूमिपूजन कार्यक्रमात भावनिक भाषण करत गेल्या काही वर्षांतील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर अप्रत्यक्ष भाष्य केले. मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाला, पण माझ्या कर्तव्यात बदल झाला नाही, असं मोठं विधान करत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. नाथ प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मराठा भवनासाठी तब्बल 28 गुंठे जागा उपलब्द्ध करून दिल्यानंतर मराठा युवा मंचच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा उल्लेख करत महाराष्ट्रात पुन्हा सलोखा आणि एकोपा निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.
धनंजय मुंडे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं, तेच वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्ष होतं. मात्र मधल्या काळात काही गोष्टी घडल्या, पण त्याची चर्चा आता होऊ नये. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, जीव लावला, त्याचे माझ्यावर उपकार आहेत. मधल्या काही वर्षांत गैरसमज झाले, भावनिक वातावरण तयार झालं, पण त्यामुळे माझ्या कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही. मी जात-पात आणि धर्म बाजूला ठेऊन राजकारण केलं, तरी मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाला, असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
यावेळी त्यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाचा देखील उल्लेख केला. डोक्यात आहे ते ओठावर आहे आणि ओठावर आहे ते डोक्यात आहे. ताकाला जाऊन भांड लपवायचा माझा स्वभाव नाही, असं सांगत त्यांनी कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नसल्याचं म्हटलं. मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण विकसित करून देणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं. परळीत उभारलं जात असलेलं ऍग्रीकल्चर कॉलेज जसं पुढील पन्नास वर्षांचा विचार करून उभारलं जात आहे, तसंच हे मराठा भवन देखील अत्याधुनिक पद्धतीने उभारलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी बैठका गार्डनमध्ये घ्याव्या लागत होत्या, हे मला बघवत नव्हतं, त्यामुळे समाजासाठी भव्य वास्तू उभारण्याचा निर्णय घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलं.
पार्थ पवारांना पटेल अन् तटकरे का झालेत नकोसे?; राष्ट्रवादीतील संघर्षाची ‘इनसाईड स्टोरी’
गेल्या दीड वर्षांपासून आपण शांत होतो कारण आपला नियतीवर विश्वास असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं. आंदोलनं, गैरसमज आणि चुकीच्या भावना या तात्पुरत्या असतात. पण सत्य एक दिवस समोर येतंच. माझी नियत साफ असेल तर माझ्याबाबत निर्माण झालेले गैरसमज नियतीच दूर करेल, यावर माझा विश्वास आहे, असं ते म्हणाले. तालुकास्तरावर उभारलं जाणारं हे पाहिलंच मराठा भवन असून या वस्तूची एक-एक वीट राचेपर्यंत कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असं ते म्हणाले.
समाजाच्या आणि शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन करत त्यांनी राजकीय विरोध हा वैचारिक असावा, असं स्पष्ट केलं. लोकप्रतिनिधी हा निवडून आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघाचा असतो. मराठा भवन हे अल्पभूधारक आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मंदिल ठरेल, याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. एकाच व्यक्तीला व्हिलन करू नका. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या काळात भावनिक वातावरण तयार झालं होतं, गैरसमज झाले होते. पण आता नव्याने सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन विकासाचं काम करायचं आहे, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
