पार्थ पवारांना पटेल अन् तटकरे का झालेत नकोसे?; राष्ट्रवादीतील संघर्षाची ‘इनसाईड स्टोरी’
NPC Politics सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Why Parth Pawar Sideline To Sunil Tatkare & Praful Patel : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) नेतृत्वावरून मोठी धुसफूस सुरू आहे. एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे धुरंधर नेते पक्षावर पकड मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे पार्थ पवार यांनी या नेत्यांविरुद्ध दंड थोपटल्याचे चित्र आहे. या वादामागे केवळ पद नाही, तर पक्षाच्या भविष्यातील वर्चस्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे. नेमकं पटेल आणि तटकरे पार्थ पवारांना का नकोसे झालेत यावर टाकलेला हा कटाक्ष…
पटेल आणि तटकरे का नकोसे झालेत ?
1. ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’वरून पहिला वार
अजितदादांच्या निधनानंतर सुतकही न फिटण्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे सर्व अधिकार स्वतःकडे घेण्याचा ‘गेम’ खेळला. पक्षात ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून स्वतःची वर्णी लावण्याचा पटेल यांचा प्रयत्न पार्थ पवारांच्या जिव्हारी लागला. “आमच्या दुःखाचा फायदा घेऊन पक्ष गिळंकृत करण्याचा हा डाव आहे,” अशी संतप्त भावना पवार समर्थकांमध्ये आहे.
2. ‘सिंडिकेट’ राज मोडीत काढण्याचा निर्धार
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या जोडगोळीने गेल्या काही दिवसांपासून पक्षातील नियुक्त्या आणि निर्णयांमध्ये पार्थ पवारांना ‘बकेट लिस्ट’वर टाकल्याची चर्चा आहे. त्यात प्रत्येक फाईलवर या दोन नेत्यांची मोहोर लागणे आता पार्थ यांच्यासाठी ‘इगो’चा प्रश्न बनला आहे. जुन्या नेत्यांची ही ‘सिंडिकेट’ मोडीत काढल्याशिवाय आपला उदय होणार नाही, हे पार्थ यांनी ओळखले आहे.
3. ‘पवार’ नावाचा ब्रँड जपण्याची लढाई
पटेल आणि तटकरे हे नेते दिल्लीच्या राजकारणात अधिक रस घेत आहेत आणि महाराष्ट्रातील पक्षसंघटना वाऱ्यावर सोडत आहेत. “पक्षाचा चेहरा ‘पवार’च हवा, तरच कार्यकर्ते टिकतील,” असा पार्थ यांचा ठाम दावा आहे. बाहेरच्या नेत्यांच्या हातात रिमोट कंट्रोल देण्यास पार्थ यांनी स्पष्ट नकार दिल्याचीही चर्चा राजकीय गोटात दबक्या आवाजात असल्याचे सांगितले जात आहे.
4. निवडणूक आयोगातील ‘लेटर बॉम्ब’
नुकत्याच निवडणूक आयोगाकडे गेलेल्या पत्रात पटेल, तटकरे आणि भुजबळांची नावे गायब करून नव्या चेहऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. हा सरळ-सरळ पार्थ पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जातोय. “पक्षात राहायचे असेल तर, आमच्या नेतृत्वाखाली राहा, अन्यथा मार्ग मोकळा आहे,” असा गर्भित इशाराच यातून देण्यात आला आहे.
वर्चस्वाची नवी समीकरणे
पार्थ पवारांचा पवित्रा हा आक्रमक आणि थेट असून, आता कोणत्याही दबावाला बळी न पडता ‘पुणे ते मुंबई’ पकड मिळवण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. त्यामुळे अनुभवाच्या जोरावर पक्ष ताब्यात ठेवण्याचे स्वप्न आता धूसर होताना दिसत आहे. ‘नव्या दमाचा नेता’ विरुद्ध ‘जुनी जाणती फळी’ अशा संघर्षात पार्थ यांनी बाजी मारण्यास सुरुवात केली आहे. पार्थ यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अजितदादांच्या शैलीतच पार्थ पवार आता समोरच्याला शिंगावर घेत आहेत. त्यांनी पटेल आणि तटकऱ्यांच्या राजकीय अनुभवाला ‘मॅनेजमेंट’ आणि ‘वारसा’ या दोन शस्त्रांनी जेरीस आणल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तटकरे आणि पटेलांनीही डाव टाकला
पार्थ पवारांनी टाकलेला डाव परतून लावण्यासाठी तटकरे आणि पटेलांनीदेखील स्पेशल डाव टाकल्याचे सांगितले जात आहे. सुनील तटकरे हे 12 मे रोजी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. तटकरेंच्या या भेटीआधीच प्रफुल पटेल हेदेखील शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते, असी माहिती आता उजेडात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत तिन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. अनेक वर्षांनी सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. ही भेट राजकीय नव्हती, शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. पण, या भेटीत दोन्ही नेत्यांनी पक्षात वाढलेल्या अंतर्गत संघर्षाबाबत पार्थ पवार यांना समज देण्याची विनंती केल्याची चर्चा आहे.
थोडक्यात सांगायचे तर, राष्ट्रवादीत आता ‘अजितपर्व’ संपून ‘पार्थपर्व’ सुरू करण्यासाठी ही साफसफाई सुरू झाल्याचे आणि पटेल आणि तटकरे यांचे पंख छाटल्याशिवाय आपल्याला गगनभरारी घेता येणार नाही, हे पार्थ यांनी आता उघडपणे कृतीतून दाखवून दिले आहे. मात्र, तटकरे आणि पटले यांनी पवारांची भेट घेतल्याने शरद पवार आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींवर नेमकी काय भूमिका घेतात की, पार्थ पवार यांना सबुरीचा सल्ला देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.