Mahadev Munde Murder Case : बीडच्या परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाला आता वेगळ वळण लागलं आहे. यामध्ये मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. (Murder) पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडेंना ताब्यात घेतलं. त्यानंतर, त्यांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
…तर मी आत्मदहन करणार, महादेव मुंडे खून प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?
गेल्या 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम आज संपला. त्यामुळे, ज्ञानेश्वरी यांनी आपल्या नातेवाईकांसह बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं होतं. यावेळी, पोलीस अधीक्षकांसोबत त्यांची चर्चा देखील झाली. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
माझ्या बहिणीचा संयम सुटला आणि तिने आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी दिली. या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ निर्णय घेण्याची गरज असून अधिवेशनात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी फड यांनी केली. महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा वर्ग केला आहे. तसंच, आरोपीच्या अटकेसाठी पथक पाठवण्यात येणार होते. मात्र, माझ्या बहिणीचा संयम सुटला. दरम्यान, पुढील उपचारासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.
काय घडलं होतं?
20 ऑक्टोबर 2023 च्या संध्याकाळी महादेव मुंडे यांनी 6 वाजता ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं. त्यानंतर पिग्मीचं कलेक्शन केलं. गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसलं. आझाद चौकात मित्राला भेटले. आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वाजता आढळून आली. ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली.
याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुकसह आणखी काही कागदपत्रं होती. ही मोटरसायकल सापडली. मात्र, महादेव मुंडे कुठे होते हे माहिती नाही. या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती. तर, दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.
21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला. हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र, तो फोन स्विच ऑफ आला. त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितलं. महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला होता आणि गळा कापलेला होता.
त्याचबरोबर हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मी कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचं आश्वासन दिल्यामुळं अंत्यविधी करण्यात आला.
बीडच्या परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाला आता वेगळ वळण लागलं आहे. यामध्ये मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. तपासाला विलंब होत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. #Beed #paralia #Mahadevmundemurdercase pic.twitter.com/qVonySpUaF
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 16, 2025