मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary) डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी असून सध्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. करीर यांच्यापूर्वी या पदासाठी नवरा-बायकोमध्ये रस्सीखेच सुरु होती. पण सरकारने मनोज सौनिक यांना मुदतवाढ दिलेली नाही. तर चर्चेत असलेल्या सुजाता सौनिक यांना वेटिंगवर ठेवत करीर यांची नियुक्ती केली आहे. ते 31 मार्च 2024 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. (Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of the Maharashtra)
आगामी लोकसभा निवडणुका आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे विद्यमान मुख्य सचिव मनोज सौनिक यांना तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. मात्र सौनिक यांच्या मुदतवाढीसाठी एक मोठी लॉबी विरोध करत असल्याचे बोलले जात होते. मनोज सौनिक यांना मुदतवाढ देणे योग्य नाही, कारण इतर अधिाकाऱ्यांवर अन्याय होईल, असे अनेकांचे मत होते.
हे मत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांकडे काही कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडले देखील होते. पण त्यावर तिघांनीही भाष्य करणे टाळल्याचे सांगितले गेले. मात्र आता मनोज सौनिक यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठतेप्रमाणे सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीची चर्चा होती. पण त्यांनाही विरोध होत होता. त्यांच्या ऐवजी नितीन करीर यांना मुख्य सचिव करण्याच्या बाजूने जोर काही मंत्री जोर लावत असल्याचे दिसून येत होते.
सुजाता सौनिक 30 जून 2023 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तर नितीन करीर हे 31 मार्च 2024 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे नितीन करीर यांच्यानंतरही सुजाता सौनिक या मुख्य सचिव होऊ शकतात. त्यामुळेच करीर यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात होती. याशिवाय राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे पेशाने डॉक्टर असलेल्या करीर यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो, अशा विविधअंगी विचाराअंती दोन्ही नवरा बायकोच्या रस्सीखेचात राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय प्रमुखपदी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नितीन करीर यांचे पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर ते 1988 साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी आतापर्यंत शासनाच्या विविध महत्वाच्या विभागांवर काम केले आहे. यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी, IGR, पुणे, पुणे महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पुणे, मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव, आयुक्त विक्रीकर, नगरविकास विभाग एकचे अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यानंतर त्यांची अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार नितीन करीर यांच्याकडे देण्यात आला होता.