राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Thackeray) यांच्या रामरक्षा आंदोलनावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची रामरक्षा हे बेगडी प्रेम आहे, असं म्हणत त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. पक्षाची रक्षा करण्यासाठी ते आता रामरक्षा म्हणत आहेत असा टोलाही शिंदे यांना ठाकरेंना लगावला आहे. राम भक्ताला चोर हरामखोर म्हणाले ते आता रामरक्षा म्हणू लागले आहेत. आता ते पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा म्हणत असल्याचंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे हे आज पंढरपूरमध्ये आले होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पंढरपूरमध्ये आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात ‘रामरक्षा आंदोलन’ सुरू केलं आहे. मुंबईत हे रामरक्षा आंदोलन केल्यानंतर नागपुरात देखील रामरक्षा आंदोलन करण्यात आलं होतं. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील निधी आणि देणग्यांमध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने भाजपवर केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.
या आंदोलनादरम्यान मंदिर परिसरात महाआरती केली जाते तसंच ‘रामरक्षा स्तोत्र’ आणि ‘हनुमान चालीसा’ यांचं पठण केलं जातं. या आंदोलनाची सुरुवात ५ जुलै रोजी मुंबईतील दादर येथील मारुती मंदिरातून करण्यात आली होती. त्यानंतर 18 जुलै रोजी नागपुरात मुख्यमंत्री निवासस्थानाजवळील श्रीराम मंदिरात एक भव्य रामरक्षा आंदोलन पार पडलं. याआधी ठाण्यातही अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात आलं होतं. यावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पक्षाची रक्षा करण्यासाठी ते आता रामरक्षा म्हणत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. डॉक्टरांना मारहाण करण्याचं समर्थन मी केलं नाही आणि शिवसेना कधीही करणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. रमेश म्हात्रे यांच्या संदर्भातील कारवाईबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
