मुंबई महापालिकेत महापौर निवडीच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी

भाजपला सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

Untitled Design (279)

Untitled Design (279)

Eknath Shinde demands mayor’s post for two and a half years : अटीतटीच्या लढतीनंतर पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला अवघ्या फरकाने बहुमत मिळालं आहे. एकूण 118 जागा जिंकत महायुतीने काठावर सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडा गाठला. यामध्ये भाजपाने 89 जागांवर विजय मिळवला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. निकाल जाहीर होताच आता महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या आणि महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

या संपूर्ण समीकरणात 29 नगरसेवकांसह शिंदेसेना निर्णायक भूमिकेत आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चाल टाकण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वीपासूनच मुंबईत भाजपाचाच महापौर होणार, अशी ठाम भूमिका भाजपाकडून मांडली जात होती. मात्र निकालानंतर भाजप बहुमतापासून दूर राहिल्याने सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेचा पाठिंबा अनिवार्य ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

मुंबईत अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर बसवण्याची परंपरा असल्याचा दाखला देत एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेत सत्तेच्या वाटपात भाजपाने शिंदेसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या मागण्यांमुळे महापौरपदावरून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात मतभेद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भोसरीचा पहिलवान अजितदादांवर कसा भारी पडला ?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही महापौरपदावर दावा केला जात आहे. “देवाच्या मनात असेल तर मुंबईत आमचाच महापौर बसेल,” असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं असून, शिंदे गटातील नगरसेवकांना उद्देशून भावनिक आवाहनंही केली जात आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीभोवती राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.

या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाव्य फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे विजयी झालेले सर्व 29 नगरसेवक सुरक्षित ठिकाणी, हॉटेलमध्ये ठेवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी सुरू असलेल्या या राजकीय रस्सीखेचीत पुढील काही दिवसांत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version