भोसरीचा पहिलवान अजितदादांवर कसा भारी पडला ?
PCMC ELECTION 2026-अजितदादांची हेच मनसुबे भोसरीच्या कसलेला पहिलवान महेशदादा लांडगेंनी उधळून लावलेत.
भोसरीचा पहिलवान अजितदादांवर कसा भारी पडला ?
PCMC ELECTION 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक (PCMC ELECTION 2026) राज्यात गाजली. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व भाजपचे भोसरीचे महेश लांडगे यांच्यात संघर्ष इरेला पेटला होता ? लांडगे यांना अजित पवारांनी सर्वबाजूने घेरलं होतं. भ्रष्टाचाराचे आरोप करत थेट भंगारवाला म्हणत, महेश लांडगेंना (Mahesh Landge) जिव्हारी लागणारी भाषा अजित पवारांनी वापरली. एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर अजित पवार हे थेट त्या नेत्याला घेरतात. परंतु अजितदादांची हेच मनसुबे भोसरीच्या कसलेला पहिलवान महेशदादा लांडगेंनी उधळून लावलेत. दादा विरुद्ध दादाची लढत महेश लांडगे यांनी सहज कशी जिंकलीय हेच पाहुया…
एकमेंकांना थेट आव्हान देणारी भाषा…
मी त्याला नगरसेवक केलं. काहींच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं. मला पश्चाताप होतोय, ज्या पद्धतीने येथे भ्रष्टाचार होतंय. नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता ? भंगारच्या गाड्या इकडून तिकडे पोहोचवयाचा. भारंदाज डाव टाकून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे थेट आव्हान अजित पवारांनी महेश लांडगेंना दिले होते. त्यानंतर महेश लांडगेंनीही अजितदादांविरुद्ध दंड ठोठावले. तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? आमच्या नादी लागू नको, अशी एकेरी भाषा लांडगेंनी अजितदादांबाबत वापरली होती. तर आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आलीये, हेच महाराष्ट्राचे आका आहेत, अशी थेट टीका महेश लांडगेंनी केली होती.
पण प्रत्यक्षात निवडणुकीत अजितदादा चितपट !
दोघांनी एकमेंकांना थेट चॅंलेज दिल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी घमासान होईल, टफ फाइट होईल, असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात मतमोजणीमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी साथ दिली ती भाजपला. पिंपरी चिंचवडमधील 128 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 84 जागा जिंकत पुन्हा सत्ता काबिज केलीय. राज्यातील एखादी तरी महानगरपालिकेवर आपले पूर्ण बहुमत राहावे, असे वाटणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला केवळ 37 जागा जिंकता आल्यात. ज्या भोसरी विधानसभा मतदारसंघात अकरा प्रभागातून 44 नगरेसवक निवडून येतात. त्यावर अजितदादांचा डोळा होता. परंतु महेश लांडगेंनी अजितदादांना डाव साधू दिला नाही. राजकीय मैदानातील कुस्तीत महेश लांडगेंनी अजितदादांवर भारंदाज डाव टाकून त्यांना चितपट केलंय.
महेश लांडगे अजितदादांवर का भारी पडले ?
महेश लांडगे यांनी भोसरी भागात आपला वर्चस्व राहावे म्हणून निवडणुकीची तयारी खूप आधी केली होती. तगडे उमेदवार तर दिलेच, स्थानिक विरोधकही कमी केलेत. ठाकरे गटात गेलेले रवी लांडगे पुन्हा भाजपात आले. ते बिनविरोध नगरसेवक झाले. त्याचा फायदा महेश लांडगेंना झाला. महेश लांडगे हे आक्रमक राहून निवडणूक लढले. अजितदादांनी लांडगेंवर थेट हल्ले केले. पण स्थानिक राष्ट्रवादीचे नेते मात्र लांडगेंवर शांत राहिले. अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल यांनी लांडगेंविरुद्ध थेट आक्रमक पवित्रा घेतला नसल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात.
विकासाचा मुद्दा आणि हिंदुत्व
महेश लांडगेंना अजितदादांनी घेरल्यानंतर भाजपचे नेतेही लांडगेंच्या मदतीला आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सभा घेतल्या. त्यांनी अजितदादांवर टीका केली. पण त्यांना मतदारांना विकासाचा मुद्द्याही पटवून दिला. त्याचबरोबर हिंदुत्वाचा मुद्दामुळे महेश लांडगेंना यश मिळाले.
भाजपच बळ आणि अनेक स्थानिक नेते पक्षात
येथील सत्ता मिळविण्यासाठी भाजपने खूप तयारी केली होती. विरोधी पक्षातील नेतेही फोडून आपल्या पक्षात आणले. जो विजयी होईल, त्याला उमेदवारी या इलेक्टिव्ह मेरिटमुळे भाजपला यश मिळालंय. भोसरीमध्ये महेश लांडगे अजित पवारांवर थेट वार करत तुटून पडले. पण दुसरीकडे भाजपने आमदार शंकर जगताप यांच्याकडे काही सूत्र दिली होती. या सर्व बाजूमुळे भाजपने अजितदादांना पिंपरी चिंचवड महापालिकेत एन्ट्री करू दिलीच नाही. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने साथ दिलीय. विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपांना हा कौल चपराक आहे, असे महेश लांडगेंनी विजयानंतर म्हटंलय. लांडगेंना थेट घेरून ही फायदा झाला नाही, याची सल अजितदादांच्या मनात राहणार हे नक्की.
