राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां सुरू आहेत. (Election) थोड्याच दिवसांत जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लागतील अशी स्थिती आहे. हे सगळं होत असतानाच आता निवडणूक आयोगाने यापूर्वी प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्यांमध्ये अद्यापही घोळ आणि दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याने आता नव्याने मतदार प्रारुप याद्या तयार करण्यात येणार आहेत.
एकट्या मुंबईतच 11 लाख दुबार मतदार आढळून आल्याने ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला आहे. आता, मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय. यापूर्वी अंतिम मतदार यादीसाठी 5 डिसेंबर ही तारीख होती, आता 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2025 असणार आहे. प्रारूप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 असेल.
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याचिकेवर महत्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे 15 डिसेंबर आणि मतदान केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 22 डिसेंबर 2025 असणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती. त्यानंतर, ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली. मात्र, या यादीत घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारुप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता.
मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळही मागितला. तसंच, एकाच व्यक्तीचे नाव दोनदा-तीनदा नव्हे, तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहितीही समोर आली आहे. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहे. केंद्रात राहुल गांधी यांनी मतदार यांद्यांबद्दल गोंधळ असल्याचं म्हटलं होत आणि राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुबार मतदार असल्याचा केलेला दावा केला होता, तो खरा असल्याचं समोर आलं आहे.
