Download App

बारामती जिंकण्याचा भाजपचा चंग! पवारांच्या बालेकिल्ल्यात नेमला ‘खास’ शिलेदार

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बारामतीचा (Baramati Loksabha) बालेकिल्ला सर करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा, उमेदवार चाचपणी, अजितदादांना सोबत घेणे यानंतर आता भाजपने बारामतीसाठी स्वतंत्र शिलेदार नेमला आहे. भाजपने पुणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण (बारामती) म्हणून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते वासुदेव काळे यांची नियुक्ती केली आहे. काळे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघ बांधणीची आणि वाढीची जबाबदारी असणार आहे. (Ex District Council member vasudeo kale appointed as Pune district bjp president)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची नियुक्ती केली. याबाबतची घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. यामध्ये पुण्यासाठी तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यात पुणे शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर मावळ विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर वासुदेव काळे यांच्याकडे बारामतीची सुत्रे देण्यात आली आहेत.

भाजपचा पॉवर गेम! जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का, नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग

कोण आहेत वासुदेव काळे?

वासुदेव काळे हे मूळचे दौंड तालुक्यातील असून शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून केली आहे. दौंड तालुक्यातील भीमा-पाटस साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुल गटाच्या पॅनेलमधून काळे आणि नामदेवराव ताकवणे या भाजपच्या दोघांनी विजय मिळविला होता. काळे आणि त्यांच्या पत्नी माधुरी काळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत पडत्या काळात पक्षाची खिंड लढवली होती. त्यांच्या याच पक्षनिष्ठेचा फळ म्हणून पक्षाच्या उभारीच्या काळात त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याची चर्चा आहे.

Shinde VS Thackery : राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार? ठाकरे-शिंदेंची धाकधूक वाढली; दोन्ही गटांकडून नोटीसला उत्तर

काळे यांनी भाजपकडून तीन वेळा दौंड विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रचारप्रमुख म्हणूनही त्यांनी 3 वेळा जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व सरचिटणीस तसेच किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले आहे. आता, राज्यातील युतीचे समीकरण बदललं असून अजित पवारांनी राष्ट्रवादीशी बंड करून भाजपची युती केली केल्याने बारामती परिसरात भाजपची ताकद आज घडीला वाढलेली आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उभारीच्या काळात संधी दिल्याचही बोललं जात आहे.

Tags

follow us