Beed Crime : बीडमध्ये काही घडत नाही असा दिवस जायना अशी सध्याची परिस्थिती आहे. (Beed) आज पुन्हा एकदा सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलून स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे. अशीच घटना काल घडली होती. गंगाराम विश्वनाथ गावडे असं या मृत शेतकऱ्याचं नाव असून, त्याला त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
परिसरातील नवगण राजुरी येथील शेती आणि ऊसतोडणीवर गुजराण करणाऱ्या शेतकरी गंगाराम विश्वनाथ गावडे यांनी दोन वर्षापूर्वी अडचणीसाठी गावातीलच लाला ऊर्फ युवराज बहीर याच्याकडून दोन हजार रुपये दहा टक्के प्रतिमहिना व्याजावर घेतले होते. या रकमेची परतफेड करूनही सावकाराने दोन हजारांची रक्कम दोन वर्षातच व्याजासकट 28 हजार केली. तसेच हे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला.
बीड जिल्ह्यात महिन्यातच दुसरी घटना; सावकारी जाचाला कंटाळून एकानं आयुष्य संपवलं
सावकाराकडून शेतकऱ्याला मारहाणीच्या धमक्या मिळू लागल्या ज्यामुळे शेतकरी मोठ्या तणावाखाली होता. शुक्रवारी सुद्धा सावकार युवराज बहीरने गंगाराम गावडेच्या घरी जाऊन त्याला पुन्हा धमकी दिली आणि मारहाण केली. शेतकरी गंगाराम गावडेला सावकाराने दुपारी अडीच वाजता शेतात बोलावून घेतलं. गंगारामची दुचाकीस्वतःकडे ठेऊन त्यांनी गंगारामला जबर मारहाण केली, यादरम्यान त्याचे कपडे सुद्धा फाडले. त्यानंतर पुतण्याने दिलेले कपडे घालून गंगारामने कसबसं घर गाठलं.
या घटनेमुळे तो प्रचंड तणावाखाली आला. पत्नीने समजूत घालून सुद्धा काही फरक पडला नाही आणि गंगारामने टोकाचं पाऊल उचललं. रविवारी पहाटे 3 वाजता गंगारामने घराजवळीलच चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घडलेल्या सर्व गोष्टी गंगारामची पत्नी आशाबाई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या आहेत. सदर प्रकरणी सावकारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी सावकार फरार झाल्याची माहिती आहे.