Food and Drug Administration clerk arrested : मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासन विभागातील एका क्लर्कला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. Anti Corruption Bureau अर्थात एसीबीने ही कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी संबंधित क्लर्कने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराशी झालेल्या तडजोडीनंतर ही रक्कम 35 हजारांवर निश्चित करण्यात आली.
तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला आणि मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजेंद्र ढेरंगे यांना रंगेहात अटक करण्यात आली. मंत्रालयाच्या इमारतीतच ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीचे सहा अधिकारी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात पोहोचले. कारवाईदरम्यान झिरवळ यांचे कार्यालय काही काळ ताब्यात घेण्यात आले होते. तपास आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्लर्कला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले.
नगर पुन्हा हादरले! घोडेगावात टोळीयुद्धातून गोळीबार, रुग्णालयात देखील राडा, एकाचा मृत्यू
दरम्यान, या घटनेवरून राजकीय वातावरणही तापले आहे. Harshvardhan Sapkal यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मंत्रालयातील कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला पकडल्याची घटना धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
जनतेची कामे पैशांशिवाय होत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, संबंधित जबाबदारांवर कारवाई करावी आणि जनतेसमोर संपूर्ण माहिती मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या कारवाईमुळे मंत्रालयातील कारभार आणि पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
