Download App

अजितदादांच्या शिलेदाराविरोधात शरद पवारांनी शोधला पर्याय; जुन्या भिडूची ‘घरवापसी’

मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) यांची ‘घरवापसी’ होणार आहे. बरोरा उद्या (19 ऑक्टोबर) राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता स्थानिक राजकारण लक्षात घेत त्यांनी पुन्हा पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बरोरा यांच्या घरवापसीने राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे स्थानिक आमदार दौलत दरोडा यांना तगडं आव्हान मिळणार असल्याची चर्चा आहे. (Former MLA Pandurang Barora will join NCP Sharad Pawar)

माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे वडील चार वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या भागात बरोरा कुटुंबियांचा मोठा दबदबा आहे. स्वतः पांडुरंग बोररा हे 2004 आणि 2014 मध्ये राष्ट्रवादीतून आमदार म्हणून निवडून आले होते. बरोरा कुटुंबीय आणि पवार घराण्याचे 40 वर्षांपासून अत्यंत घनिष्ठ संबंध होते. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पाहिले जात होते.

ललित पाटील प्रकरणात बोलणाऱ्या अनेकांची तोंड बंद होणार; फडणवीसांचा इशारा

मात्र 2019 च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे तीन वेळचे आमदार राहिलेल्या दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या येण्याने बरोरा यांचा पत्ता कट होणार असल्याचे बोलले जात होते. त्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत तिकीट फायनल केले होते. मात्र त्या निवडणुकीत पांडुरंग बरोर यांचा 15 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव झाला. त्यानंतर शिवसेनेतील बंडानंतर बरोरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. मात्र कालांतराने राष्ट्रवादीत अजित पवार यांचे बंड झाले. त्यांच्या बंडानंतर दरोडा यांनीही अजितदादांना पाठिंबा दिला.

त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढल्यास दरोडा यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हेच स्थानिक राजकारण लक्षात घेत आणि पवार यांच्या पर्यायी नेतृत्व देण्याच्या धोरणानुसार बरोरा यांनी घरवापसीचा निर्णय घेतला. ते उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, यामुळे दरोडा यांना तगडं आव्हान मिळणार असल्याची चर्चा आहे.

Vijay Wadettiwar : कोणत्या मंत्र्याचा आशीर्वाद ललित पाटीलला होता? वडेट्टीवारांचा थेट सवाल

अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवार यांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपमधील माजी आमदार, भाजपमधील डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये  बी. एस. पाटील, भंडारा-गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले आहे.

follow us