मुंबई : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे (Shivsena) शहराध्यक्ष महेश गायकवाड (Mahes) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही (BJP) नेते सुन्न झाले आहेत. सर्व विरोधक या घटनेनंतर एकवटले असून यामुळे शिंदे सरकारही काहीसे बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे. मात्र सत्ताधारी आमदारांकडूनच कायद्याचे धिंडवडे काढणाऱ्या यादीत गणपत गायकवाड पहिले नाहीत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर या यादीत अनेकांची नावे आली आहेत. (Ganpat Gaikwad, Prakash Surve, Sada Sarvankar, Santosh Bangar, Sanjay Gaikwad is name of law breakers from the ruling MLAs)
मुंबईतील प्रभादेवी परिसरात गतवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन गटात जोरदार राडा झाला होता. या वेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र गोळी झाडण्यात आलेली बंदूक सरवणकर यांची असली, तरी गोळी झाडणारी व्यक्ती दुसरीच होती, असा अहवाल पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे सरवणकर यांना दिलासा मिळाला.
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांचेच सरकार असताना ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील मागाठाणे इथल्या कोकणी पाडा बुद्धविहारमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधीने सार्वजनिक व्यासपीठावर इतकी चिथावणीखोर भाषा केल्याने विरोधकांनीही त्यांचा समाचार घेतला होता.
“कोणी तुम्हाला अरे केले तर, तुम्ही का रे करा. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ठोकून काढा, प्रकाश सुर्वे इथे बसला आहे. हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा. दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो, चिंता करु नका. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही, पण अंगावर आल्यास शिंगावर घेऊन त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही.” असे सुर्वे म्हणाले होते.
आमदार प्रकाश सुर्वे यांचाच मुलगा राज सुर्वे याच्यावर काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांना मारहाण केल्याचा आणि त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात राजसह विकी शेट्टी आणि 10 ते 12 जणांवरविरोधात वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैशांच्या व्यवहारातून राजकुमार सिंग यांना त्यांच्याच ऑफिस जाऊन मारहाण केल्याचे आणि त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले होते.
शिवसेनेच्या आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण अनेक वेळा दिसून आले आहे. संतोष बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी एका मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकला मारहाण आणि शिवीगाळ केली होती. तो व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर पीक विमा कंपनी कार्यालयातील बैठकीला अधिकारीच हजर नसल्याचे पाहुन बांगर यांनी थेट कार्यालात घुसून साहित्याची मोडतोड केल्याची घटना घडली होती. हा वादही चर्चेत आला होता.
याशिवाय हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडियो मध्यतंरी व्हायरल झाला होता. यानंतर हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. सोबतच यात्रेसाठी परंपरेचा दाखला देत दर्शनापासून रोखल्याने बांगर यांनी तिथे उभ्या असलेल्या गावकऱ्याच्या थेट कानाखाली ठेऊन दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दलही अधून-मधून वादग्रस्त विधाने किंवा कायदा हातात घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. गत दिवाळीत बुलढाण्याच्या मेहकर शहरात काही समाजकंटकांनी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली, तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी, काठी, दगडांनी मारहाण केली होती.
यानंतर पोलिसांनी संबंधित गुंडावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली होती. मात्र त्यानंतरही आमदार गायकवाड हे 50 वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकर पोलीस स्थानकात पोहचले. तिथे ठाणेदाराला झापझाप झापले. पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांचा जामीन झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा त्यांनी पोलिसांसमोरच दिला होता.
काही दिवसांपूर्वी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ठाकरे गटाच्या संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली होती. यावेळी पोलिसही उपस्थित होते. मात्र त्यानंतरही आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्याकडून हे कृत्य केल्याचे समोर आले होते. तसे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले होते.
राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची घोषणाही केली आहे. पण याचमुळे संतप्त झालेल्या संजय गायकवाड यांनी भुजबळांच्या कंबरेत लाथ मारून त्यांना हाकलून देण्याची भाषा केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुनही मोठा वाद निर्माण झाला होता.
भाजप आमदार सुनील कांबळे हेही नुकतेच वादात सापडले होते. ससून रुग्णालयातील कार्यक्रमात एका पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याचवेळी आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यालाही मारहाण केली होती. कोनशिलेवर नाव नसल्याने ते संतप्त झाले होते, यातूनच हा प्रकार घडला असल्याचे बोलले गेले होते. पण याप्रकरणी कांबळे यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर हा प्रकार घडला होता.
हे सगळे हाणामारी आणि धमक्यांचे वाद एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला गणपत गायकवाड यांनी थेट बंदुकीतून गोळ्या झाडत पोलीस स्टेशनमध्येच मित्र पक्षाच्याच नेत्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो, आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही नेते सुन्न झाले आहेत. यावर आता पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली आहे. मात्र भाजपकडून त्यांच्यावर काय कारवाई होते हे येत्या काही दिवसांतच कळून येईल.