Gautam Adani’s brother was involved in breaking Sharad Pawar’s party : बारामतीत ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सेंटरचं उदघाटन आज अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी(Gautam Adani) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी हे बारामतीत आले असता विभागले गेलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसकडून उद्योगपती अदानी आणि पंतप्रधान मोदींच्या संबंधांवर कायम टीका होत असताना अदानी हे शरद पवारांसोबत(Sharad Pawar) एकत्र आल्याने चर्चाना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भाजप आणि भाजपचा मित्र मुंबईवर ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे, त्याला आमचा तात्त्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदानी यांना मुंबईला ताब्यात घेण्याच्या विरोधात आमची लढाई आहे. भाजपकडून मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते उद्योगपती आहेत. पण गौतम अदानींसारखा हव्यास इतर उद्योगपतींनी मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचे दिसून येत नाही. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत. पण ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे, अशी विखारी टीका त्यांनी यावेळी केली.
Digvijay Singh On CWC : काँग्रेसमध्ये अनेक स्लीपर सेल अन् सीडब्ल्यूसीच्या बैठकीत दिग्विजय सिंह भडकले
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि शरद पवार यांचे संबंध हे राजकीय कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अदाणींना बोलावलं असेल आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब, ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. तर रोहित पवारांनी अदानींच्या गाडीचं सारथ्य का केलं, हे त्यांनाच विचारा, असे देखील संजय राऊत म्हणाले.
