Video : उपचार थांबवून जरांगे पाटील तातडीने अंतरवालीत; 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वीच मोठा निर्णय

सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

News Photo   2026 08 16T151915.336

Video : उपचार थांबवून जरांगे पाटील तातडीने अंतरवालीत; 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वीच मोठा निर्णय

अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांसोबत (Jarange) मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानंतर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सरकारच्या निर्णयांमध्ये नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या आहेत, कोणत्या बाबींची दुरुस्ती आवश्यक आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असावी, यावर बैठकीत सविस्तर चर्चा होत आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी ते थांबवून अंतरवाली सराटी गाठली. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बैठकीत जरांगे पाटील यांनी अभ्यासकांना आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याचे आवाहन केले. शासनाचा जीआर चुकीचा असेल तर नंतर आरोप करण्यापेक्षा आत्ताच त्यातील त्रुटी दाखवा, सुधारणा सुचवा आणि काय दुरुस्त करता येईल ते सांगा, अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजाच्या हितासाठी मतभेद बाजूला ठेवून चर्चा होणे गरजेचे असून अभ्यासकांनी राजकीय अजेंडा घेऊन नव्हे, तर समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासासाठी यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जरांगेंच्या प्रकृतीबाबत अपडेट; तपासणी अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार

यावेळी अभ्यासकांनी हैदराबाद गॅझेटपासून सातारा गॅझेटपर्यंतच्या नोंदी, वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा आणि सगेसोयऱ्यांचा जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख नसल्यासारख्या विविध बाबींवर आपली मते मांडली. शासनाच्या परिपत्रक आणि निर्णयांमध्ये नेमक्या कुठे अडचणी निर्माण होऊ शकतात, याकडेही त्यांनी जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले. सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यापूर्वी या सर्व मुद्द्यांचा आढावा घेऊन ठोस भूमिका निश्चित करण्याचा जरांगे पाटील यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अंतरवाली सराटीत आजच्या बैठकीसाठी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित झाले आहेत. अभ्यासकांच्या सूचनांनंतर जरांगे पाटील आता कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे सरकारसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रकृती साथ देत असल्यास विदर्भ आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकारला ते नेमका कोणता इशारा देतात आणि कोणत्या मागण्या पुढे करतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Exit mobile version