मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या घरासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकारणी अमरावतीच्या खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याविरोधातील याचिकेवर सुनावणी आज होणार होती. परंतु, मुंबई विशेष न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली आहे. आता याबाबतची पुढील सुनावणी येत्या ६ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या घरासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण केले होते. त्यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याची सुनावणी मुंबई विशेष न्यायालयात होणार होती. परंतु, आज देखील ही सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी येत्या ६ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे.
हनुमान चालीसा पठण प्रकरणाची सुनावणी यापूर्वी जानेवारी २०२३ आणि २२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार होती. मात्र, या दोन्ही वेळी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज ती होणार होती. मात्र, आजची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या घरासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण करण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याबाबची सुनावणी होण्यापूर्वी राणा दाम्पत्याने मुंबई विशेष न्यायालयात आम्हाला हनुमान चालिसा पठण प्रकरणात दोषमुक्त करा, असा अर्ज केला आहे. मात्र, या प्रकरणाची अद्याप सुनावणी झालेली नाही. तर दरवेळी सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे येत्या ६ एप्रिल रोजी तरी सुनावणी होणार का याकडे लक्ष लागले आहे.