महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आणि बूटांना मुजरा करत हर्षवर्धन सदगीरने घेतली निवृत्ती

दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्यांनी कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती जाहीर करत राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Untitled Design 78

Untitled Design 78

Harshvardhan Sadgir retires : 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरलेले हर्षवर्धन सदगीर यांनी कुस्ती विश्वाला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्यांनी कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती जाहीर करत राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्पर्धा जिंकल्यानंतर भावूक झालेल्या हर्षवर्धन सदगीर यांनी मैदानातच आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाची कहाणी सांगत सरकारच्या दुर्लक्षावरही टीका केली.

हर्षवर्धन सदगीर म्हणाले, माझं स्वप्न होतं की एकदा महाराष्ट्र केसरी होऊन दाखवायचं आणि ते मी करून दाखवलं. आज दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो, त्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण आता मी कुस्तीमधून निवृत्ती घेत आहे. मला सरकारची गरज नाही. सरकारने मला पाण्यात पाहिलं. मी गरीब घरचा महाराष्ट्र केसरी आहे. नोकरीसाठी अनेक ठिकाणी फिरलो, पण सरकारने मला नोकरी दिली नाही.

प्रत्येक धर्मात काही सडके आंबे असतात, अशोक खरात प्रकरणावर नितेश राणेंनी दिली प्रतिक्रिया

सरकारच्या निष्काळजीपणामुळेच हा निर्णय घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात अनेक खेळाडूंना मोठ्या आश्वासनांची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात मदत मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. स्पर्धा जिंकल्यानंतरचा त्यांचा क्षण भावनिक होता. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या पायातील बूट काढले, त्या बुटांचे चुंबन घेतले आणि कुस्तीच्या मैदानाला अखेरचा सलाम केला. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

गरीब कुटुंबातून येत कठोर मेहनतीच्या जोरावर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने कुस्तीपटूंना दिलेल्या आश्वासनांबाबत आणि खेळाडूंना नोकरीच्या संधीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या या दमदार कुस्तीपटूने अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे कुस्तीप्रेमींमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकांनी सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि खेळाडूंना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version