IAS officer Tukaram Munde mourns his mother’s death : ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या संदर्भात एक दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या मातोश्री आसाराबाई हरिभाऊ मुंढे यांचे पुण्यात निधन झाले आहे. त्या शंभर वर्षाच्या आसपास वयाच्या होत्या, अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, 3 एप्रिल रोजी 9 वाजता बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे हे कामानिमित्त पश्चिम बंगाल येथे गेलेले असताना त्यांना ही दुःखद बातमी मिळालाय. त्यानंतर ते तातडीने पुणे येथे रवाना झाले आहेत.
दरम्यान प्रशासकीय सेवेत कडक शिस्त आणि पारदर्शक कारभारासाठी ओळख असलेले तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. 2005 च्या तुकडीतील या आयएएस अधिकाऱ्यांनी गेल्या 21 वर्षांत तब्बल 24 वेळा बदली अनुभवली आहे. या वारंवार बदल्यांमुळे प्रशासकीय व्यवस्थेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अलीकडेच त्यांची दिव्यांच्या कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली असून, आता त्यांची मंत्रालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. नव्या जबाबदाऱ्यांमुळे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, तसेच महसूल आणि वन विभाग यांसारखी महत्वाची खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
रुपया 94.85 वरून 93.59 पर्यंत मजबूत; RBIच्या हस्तक्षेपामुळे चलनबाजारात मोठी उलथापालथ
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांनी पारदर्शकता, शिस्त आणि कठोर प्रशासनाचा ठसा उमटवला आहे. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे, अनियमितता उघडकीस आणणे, तसेच गैरहजेरी आणि शिस्तभंगाविरोधात कठोर कारवाई करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळेच ते प्रशासकीय वर्तुळात ‘सिंघम’ म्हणूनही ओळखले जातात.
