धाडसी निर्णय, बदल्यांची मालिका अन् वादग्रस्त घडामोडी; मुंढेंच्या संघर्षावर भाष्य करणारं ‘तुकाराम’ पुस्तक
IAS तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर भाष्य करणारं 'तुकाराम' पुस्तक येत्या 17 जुलै रोजी पुण्यातील टिळक स्मारकमध्ये प्रकाशित होणार आहे.
Tukaram Book : प्रशासकीय सेवेत धाडसी निर्णय घेणारा, कडक अन् शिस्तीचा IAS अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची ओळख. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेताच मुंढे यांनी अन्न पदार्थांमध्ये भेसळ, भेसळयुक्त दूध, हॉटेल्स मालकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. आपल्या कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. आता तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर आधारित ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ (Tukaram Book) हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. येत्या 17 जुलैला पुण्यातील टिळक स्मारकात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आधीच चर्चेच असलेले मुंढे यांच्यावर आधारित पुस्तक प्रकाशन होत असल्याने मुंढे समर्थकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालीयं.
पुण्यातील सदाशिव पेठेतील टिळक स्मारकामध्ये तुकाराम पुस्तक प्रकाशन सोहळ्याला खुद्द IAS तुकाराम मुंढे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पुस्तकामध्ये तुकाराम मुंढे यांच्या जन्मापासून ते बालपणातील हालअपेष्टा, तारुण्यातील अभावग्रस्त जीवन ते आयपीएस होण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन असल्याची माहिती लेखक शफी पठाण यांनी माध्यमांशी बोलताना दिलीयं. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांना शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून ते आजतागायत झालेल्या त्रासाबद्दलही स्पष्टपणे लिखाण करण्यात आल्याचा उल्लेख पठाण यांनी केला आहे.
पुस्तक प्रकाशनाआधीच 1 लाख प्रतींची बुकिंग…
मुंढे सध्या एवढे चर्चेत आहेत की, पुस्तक येणार म्हटल्यावर वाचक वर्गाने पुस्तकाला चांगलीच पसंती दिली असल्याचं दिसून येत आहे. येत्या 17 जुलै रोजी पुस्तक प्रकाशन होणार आहे. त्याआधीच तब्बल 1 लाख वाचकांनी पुस्तकाची बुकिंग केली आहे. या पुस्तकाची बुकिंग 250 रुपये असून 1 लाख बुकिंग म्हणजे तब्बल 2.5 कोटी रुपयांची बुकिंग झाल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून होत असलेल्या कारवायांमुळे तुकाराम मुंढे चांगलेच चर्चेत आलेले आहेत. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या बेधडक कारवायांचे पडसाद थेट विधानसभेत पावसाळी अधिवेशनातही उमटलेले दिसून आले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया असो, अथवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मुंढे यांच्यासंबंधित बातमी मुंढे समर्थक श्वास रोखूनच पाहतात. आता पुस्तक प्रकाशन होत असल्याने या पुस्तकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
पुस्तक लिहिण्याचं ठरवलं अन् तुकाराम मुंढेंचं नाव पुढं आलं…
ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण यांनी मागील 25 वर्षे माध्यमांमध्ये नोकरी केली. पुढे आपण काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय पठाण यांनी घेत माध्यम क्षेत्रातून बाहेर पडले. जोपासलेल्या ज्ञानाच्या जोरावर एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिण्याचा विचार पठाण यांच्या मनात आला आणि पहिलं नाव पुढे आलं ते म्हणजे तुकाराम मुंढे यांचं, असं पठाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज्यभरात तुकाराम मुंढे यांचे समर्थक आहेत. अलीकडेच भेसळयुक्त कारवाईनंतर अनेक ठिकाणी मुंढे समर्थकांनी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करुन समर्थन दर्शवलं होतं. त्यानंतर आता ‘तुकाराम’ पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. त्यामुळे या पुस्तकात नेमकं काय लिहिलंय, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.