प्रतिनिधी, प्रशांत गोडसे
देशाची आर्थिक राजधानी आणि आशियातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या (Mumbai) मुंबई महानगरपालिकेत एका रात्रीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ अभेद्य असल्याचा दावा केला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबईतील एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या अनपेक्षित बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबर धक्का बसला असून, आता महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गट शिंदेंच्या दावणीला बांधले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निधीसाठी निष्ठा बदलली?
मालाड येथील प्रभाग क्रमांक ४३ मधून निवडून आलेले आणि शरद पवारांचे निष्ठावंत समजले जाणारे अजित रावराणे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्यानंतर रावराणे यांनी सत्तेच्या बाजूने कौल दिला. याबाबत बोलताना रावराणे यांनी विकासाचे कारण पुढे केले आहे. “गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळवणे जिकिरीचे झाले होते. विरोधी पक्षात राहून कामे रखडत आहेत. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी सत्तेसोबत जाणे आवश्यक आहे,” असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना भरघोस निधी आणि सहकार्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
ठाकरेंची कोंडी, शिंदेंची चांदी
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शरद पवारांच्या पक्षाची भक्कम साथ होती. मात्र, रावराणे यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीची महापालिकेतील ताकद कमालीची क्षीण झाली आहे. अजित पवार गटाचे नगरसेवक यापूर्वीच महायुतीसोबत आहेत. आता शरद पवारांचा उरलासुरला एकमेव शिलेदारही गळाला लागल्याने, तांत्रिकदृष्ट्या मुंबई पालिकेतील संपूर्ण ‘राष्ट्रवादी’ ताकद एकनाथ शिंदेंच्या मागे उभी राहिली आहे. आगामी काळात होणाऱ्या महापौर आणि विविध समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे पारडे जड झाले असून, अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही आपल्याकडे खेचण्यात त्यांना यश येत असल्याचे दिसत आहे.
मतदारांशी प्रतारणा की राजकीय अपरिहार्यता?
दुसरीकडे, रावराणे यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीतून संताप व्यक्त होत आहे. “ठाकरेंच्या आणि पवारांच्या नावावर मते मागून निवडून आलेले नगरसेवक आता सत्तेसाठी निष्ठा बदलत आहेत, हा मतदारांशी केलेला द्रोह आहे,” अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. मात्र, या बंडामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात ‘मविआ’ची अवस्था बिकट झाली असून, ठाकरेंना आता नव्याने रणनीती आखावी लागणार आहे, हे नक्की.
