Download App

तु मुलांसोबत झोपतेस का?, तुम्ही रां…आहात, पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

पुण्यात तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल मारहाण केली. सुप्रिया सुळेंच ट्वीट

  • Written By: Last Updated:

Pune/Kothrud Police : पुण्यातील कोथरूड पोलिसांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोणतीही (Kothrud) पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या महिलांनी पोलिसांनी पदाचा गैरवापर, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य केल्याचं म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक २३ वर्षीय विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्या पुढे आल्या. त्यांनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं. तसंच, स्वावलंबी होण्यासाठी कौशल्य विकास कोर्ससाठीही मदत केली. त्या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुणे पोलिसांची मदत घेतली. कोणत्याही वॉरंटशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय, कोथरूड पोलिसांनी आम्हा तीन महिलांच्या घरी छापा टाकला. यानंतर आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेलं असंही त्या म्हणाल्या.

पुणे एमआयडीसीत अजितदादांची दादागिरी? CM फडणवीसांच्या विधानावर रोहित पवारांचा सवाल, राजकीय भडका

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये वेगळ्या खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली. तसंच, अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि संभाजीनगर येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप या महिलांनी केला आहे. तू महार-मांगाची आहेस म्हणून असं वागते का?, तू रांड आहेस, मुलांसोबत झोपतेस का?, तुम्ही सगळे LGBT आहात का? अशी अपमानास्पद भाषा वापरण्यात आली. त्यांना पाच तास रिमांड रूममध्ये ठेवण्यात आलं. या काळात मोबाईल जप्त करून पासवर्डही बदलण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे.

या महिलांनी मानवी आणि कायदेशीर हक्कांच्या पायमल्ली विरोधात तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत पोलिसांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास उलटूनही पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती करूनही मारहाण झालेल्या महिलेला वैद्यकीय तपासणीची परवानगी नाकारण्यात आल्याचंही समोर आलं. या प्रकरणी पीडित महिलांनी म्हटलं आहे की, जर कोथरुडसारख्या सुसंस्कृत भागात पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल, तर भविष्यात कोणीही पीडितांना मदत करण्यासाठी पुढं येणार नाही. ताकदवान लोकांच्या दबावाखाली पोलीस कसे बेकायदेशीर काम करतात, हे या घटनेतून स्पष्ट होतंय, असा आरोप त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितलं की, हे सगळे आरोप तथ्यहीन आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे एका महिलेची मिसिंगची तक्रार होती. त्या तपासात पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना सहकार्य केलं. महिलांना कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ किंवा मारहाण करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला ‘व्हॉट्सॲप’वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे असं त्या म्हणाल्या आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे ट्वीट सुप्रिया सुळेंनी केले आहे.

follow us