Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये घरावर पहाटे दोनच्या सुमारास दरोडा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव येथे एका घरावर पहाटे दोनच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी आलेल्या नऊ दरोडेखोरांना नागरिकांच्या सावधानतेमुळे पळून जावं लागलं. संदीप चाबुकस्वार (रा. तिसगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना पळवून लावल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घरातील एका खोलीची बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. या वेळी घरातील सदस्यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली असता, आवाज ऐकून शेजारी व नागरिक गोळा झाले. या वेळी नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता नऊ जण पळून जाताना आढळून आले आहेत.
या परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी अंधार; तसेच चोरट्यांना लपण्यासाठी जागा असल्याने ते पळून जातात. बजाजनगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका उद्योजकाच्या घरावर मोठा दरोडा पडला होता. यामध्ये साडेपाच किलो सोनं व बत्तीस किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली. त्याचा अजून पूर्ण तपास झालेला नाही. त्यातच ही घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून, परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी आणखी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली; तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तिसगाव येथील दरोड्याच्या प्रयत्नानंतर ग्रामपंचायतीने घटनेची गंभीर दखल घेतली असून, परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी पोलिसांना या भागात गस्त वाढवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. या वेळी सरपंच शकुंतला कसुरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरातील एका खोलीची बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. #ChhatrapatiSambhajinagar #Theft pic.twitter.com/jezhMuFXgl
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 16, 2025