Prostitution In Beed District : गेली अनेक दिवसांपासून बीड जिल्हा हा राज्यभरात या ना त्या कारणाने चर्चेत आहे. त्यामध्ये गुन्हेगारीने टोक गाठलेलं असतानाच आता नवा प्रकार समोर आला आहे. (Beed) कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा मारून १० पीडितांची सुटका करण्यात आली. केज तालुक्यातील उमरी येथे हा प्रकार सुरू होता. यात कला केंद्रचालक महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी (ता. २४) पहाटे ही कारवाई केली. उमरी शिवारात महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रात महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी पहाटे सापळा रचून उमरी येथे छापा मारला. यावेळी तेथे वेश्या व्यवसाय चालू होता. यातील १० पीडित महिलांची तातडीने सुटका करण्यात आली. दरम्यान, महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रात सत्त्वशीला बाबासाहेब अंधारे, आदित्य सत्त्वशीला अंधारे, मयूर बाबूराव अंधारे हे तिघे पीडितांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते.
वरील आरोपींविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे, सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे, बहिरवाळ, शिंदे, अविनाश घुंगरड, शुभम घुले, अर्चना वंजारे व भाग्यश्री खांडेकर यांनी केली.