प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)
Sharad Pawar यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईमधील येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नाट्य घडलं. लोक माझे सांगाती, या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाल्यानंतर पवार यांनी ही घोषणा केली आणि उपस्थित नेते आणि कार्यकर्ते यांना धक्का बसला. त्यावरून व्यासपीठावरूनच काही नेते भावनात्मक प्रतिक्रिया देत असताना त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार तेथेच सुनावले. या झापाझापीत काही राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे का, याची चर्चा त्या निमित्ताने सुरू झाली.
सुषमा अंधारेंचं शरद पवारांना पत्र; ‘साहेब, तुमचा निर्णय अठरापगड जातीला….’
प्रत्येक नेता, कार्यकर्ता आपापल्या परिने भूमिका मांडत होते. हे सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) हे जोरजोरात आपली भूमिका मांडत होते. शरद पवार यांनी याच ठिकाणी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याचा निर्णय जाहीर करावा, असा आग्रह पुन्हा-पुन्हा करत होते. अजित पवार यांनी दोन वेळा मेहबूब शेख यांच्याकडून माईक काढून घेतला होता. पण मेहबूब शेख मध्ये-मध्ये आक्रमक होत होते. त्यावेळी एका नेत्याचा फोन आला, हा फोन पवारांना द्यायला जात असताना मेहबूब शेख यांच्याकडून काढून घेत अजित पवारांनी तो संतापात टेबलावर आपटला.
यानंतर प्रफुल्ल पटेल हे भूमिका मांडण्यासाठी उभे होते. शरद पवार यांच्याशी बोलून निर्णय घेऊन सर्वांना कळवू असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. यावेळी मेहबूब म्हणाले, तोपर्यंत आम्ही इथेच आमरण उपोषणाला बसू. यावर अजित पवार अधिकच चिडले. मेहबूब शेखकडे संतापाने पाहत तू मग थेट घरी जा, असे म्हणाले.
अजित पवार आणि मेहबूब शेख यांचा हा संवाद कार्यकर्ते आणि नेत्यातला होता? की जयंत पाटील गटाचा तो वाद होता? यावर चर्चा रंगली आहे. मेहबूब शेख हे जयंत पाटील यांचे अत्यंत विशासू समजले जातात. पाटील यांच्या आग्रहाखातर मेहबूब शेख यांना युवाचे अध्यक्षपद मिळालं होतं. शेख अडचणीत असताना जयंत पाटील यांनी त्यांच्यासाठी किल्ला लढवला होता. ही सर्व पार्श्वभूमी पाहता मेहबूब शेख यांचा संघर्ष जयंत पाटील गटाचा संघर्ष तर नव्हता ना? याबाबत चर्चा रंगली आहे.
आमदार संजय बनसोडे यांनाही अजितदादांनी सोडले नाही. ए संजय तू गप्प बस, अशा शब्दांत अजितदादांनी सुनावले. चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांनी पवारांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्या वेळी एका उत्साही कार्यकर्त्याने महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार अशी घोषणा दिली. त्यावर त्या कार्यकर्त्याला टपली मारून अजितदादांनी अरे देशाचा नेता म्हण, असे सांगितले. तो व्हीडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला. यशवंतराव चव्हाण केंद्रातील सभागृहात सुप्रिया सुळे यांनी बोलण्याचा प्रयत्न करताच तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून मी सांगतोय, असे अजितदादांनी ठामपणे सांगत असल्याचा व्हिडीओदेखील चांगलाच चर्चेत आला. शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर रडारड करू नका, हे कधी ना कधी घडणारच होते, असे सांगत कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. बहुतांश नेत्यांना धक्का बसल्याचे चित्र होते. अजित पवार मात्र पवारांचा राजीनामा स्वीकारण्यावर ठाम होते.