उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील; जयकुमार गोरेंचा टोला

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली आहे.

Untitled Design   2026 08 01T080924.998

Untitled Design 2026 08 01T080924.998

Jaykumar Gore criticizes Uddhav Thackeray : राज्यातील राजकारणात अभिजित दीपक यांच्या नावावरून नव्या चर्चांना उधाण आले असतानाच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली आहे. देहू रोड भाजपच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन तसेच रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना जयकुमार गोरे यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.

यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत म्हटले की, विरोधी पक्षांची भूमिका ही सरकारवर अंकुश ठेवण्याची असते. त्यासाठी संसद आणि विधानमंडळात चर्चा करून जनतेचे प्रश्न मांडणे अपेक्षित असते. मात्र विरोधकांकडे आता कोणताही ठोस मुद्दा उरलेला नसल्याने ते सभागृहाऐवजी रस्त्यावर आंदोलन करण्यात व्यस्त आहेत. या गोष्टी जनतेच्या लक्षात येत असून विरोधकांचा दुटप्पीपणा उघड होत असल्याचे देखील गोरे यांनी म्हटले.

खासदार रक्षा खडसे यांच्या संदर्भातील कथित व्हायरल व्हिडीओबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोरे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोणतीही दृश्यफीत किंवा ध्वनीफीत खरी आहे की बनावट, याची शहानिशा करणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित क्लिपची सत्यता समोर आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

NDRF च्या टीम तैनात! नाशिक जिल्ह्यात 500 मिलीमीटर पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज काय?

दरम्यान, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करण्याची दिलेली हाक यावरही जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सातत्याने प्रयत्न केले असून आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्याचा दावा त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या भावना आणि मागण्या समजून घेत सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. मात्र अशा प्रकारचे निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यासाठी काही कालावधी लागतो. सरकार मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून मनोज जरांगे यांचे समाधान होईल अशा पद्धतीने पुढील कार्यवाही केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका करताना जयकुमार गोरे यांनी खोचक टिप्पणी केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अस्तित्व आता मोठ्या प्रमाणात कमी झाले असून पक्ष स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत असल्याचा दावा त्यांनी केला. अभिजीत दीपके यांच्या वाढत्या चर्चेचा संदर्भ देत, आगामी निवडणुका उद्धव ठाकरे हे अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली लढतील, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, अभिजीत दीपके यांना उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी निमंत्रित केल्याच्या वृत्तानंतर भाजप नेते परिणय फुके यांनीही ठाकरे गटावर जोरदार टीका केली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना फुके यांनी हिंदीतील प्रसिद्ध म्हणीचा आधार घेत विरोधकांवर निशाणा साधला. “डूबते को तिनके का सहारा” अशी परिस्थिती सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेससारख्या पक्षांची झाली असल्याचे ते म्हणाले. राजकीयदृष्ट्या कमकुवत होत चाललेल्या या पक्षांना अभिजीत दीपके यांच्या रूपाने एका काडीचा आधार मिळाल्याची टीका त्यांनी केली.

मोठी बातमी : भाजपच्या विजय चौधरींचे ऑडिओ व्हायरल करणारा निघाला पीए; अखेर यश टिपरेला अटक

फुके यांनी पुढे म्हटले की, जनाधार गमावत चाललेल्या विरोधी पक्षांकडे आता नव्या चेहऱ्यांच्या शोधाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच अभिजीत दीपके यांच्याभोवती निर्माण झालेल्या चर्चेला ते महत्त्व देत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करते आणि राज्यातील महायुती सरकारच्या कामांवर विश्वास ठेवते, असा दावा त्यांनी केला.

अभिजीत दीपके यांना उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावल्याच्या वृत्तानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. या भेटीमागील नेमका राजकीय उद्देश काय, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असताना भाजप नेत्यांच्या टीकेमुळे हा मुद्दा आणखी चर्चेत आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version