Jitendra Awhad on Walmik Karad Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड दोन दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण गेला. परंतु, तो ज्या गाडीतून येऊन पोलिसांना शरण गेला ती गाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील असल्याचा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. (Jitendra Awhad ) त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या गाडीतून वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसच्या दारात उतरला अन् ताठ मानेने आतमध्ये गेला त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उघड केलय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. अजित पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल. अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
SIT Team In Beed : एसआयटी अॅक्शन मोडवर, वाल्मिक कराडची दोन तास चौकशी, काय घडलं ?
आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला. त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे! तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, याही पेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकारांनी मला असे सांगितले की, “आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय. आम्ही उद्या मुंबई, पुण्याला निघून जाऊ , कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने लागले आहेत. वा रे… वाह ! आधुनिक महाराष्ट्र, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
या पोस्टआधीही त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यातही त्यांनी वाल्मिक कराड प्रकरणी संशय व्यक्त केलाय. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल स्पष्टपणे सांगतात की, जर एखाद्या महत्वाच्या गुन्हेगाराला न्यायालयात हजर करायच असेल तर त्याला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देखील हजर करता येऊ शकते. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याला केजला नेण्यात आले. वाल्मिक कराड हा पुण्यात सरेंडर होणार, हे सबंध महाराष्ट्राला माहित होते. वाल्मिक कराडला कधी केजला नेणार, हेदेखील लोकांना माहित होते. त्यामुळेच पुणे आणि केज येथे अराजकता माजवण्यासाठी हजारो लोकं तयार ठेवली होती. म्हणजेच, एवढी अराजकता आणि एवढी दहशत मला वाटत नाही, मुंबईच्या गँगवॉरमध्येही कुणी माजवली असेल असंही ते म्हणालेत.
मला बीडमधील लोकांना आठवण करून द्यायची आहे की, मुंबईत अनाचार, अराजकता माजवणारा अंडरवर्ल्ड आणि त्यांचा गँगवॉर जर कुणी संपविला असेल तर त्यातील एक नाव स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे होते. गँगवॉर संपविणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या बीडमध्ये दहशत माजवण्याची आणि गँगवॉरची जी तयारी होत आहे, ती तर इटलीमधील माफियांना लाजवेल इतकी भयानक आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, तीच गाडी आरोपी पोलिसांसमोर हजर होण्यासाठी वापरतो, हे तर गणित कधीच न सुटण्यासारखेच आहे. महाराष्ट्राची राजकीय गुंडगिरी ही फक्त राजकीय नेतृत्वाने पोसायची, याचा अर्थ स्पष्ट होतो की, महाराष्ट्राला बरबाद करण्याची सुपारी घेण्यासारखेच आहे, असाही संताप त्यांनी व्यक्त केला.
ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 2, 2025