परळी पुन्हा हादरली! हॉटेल व्यवसायिकाची धारदार शस्त्राने हत्या

पहाटेच एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मात्र दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

News Photo   2026 05 22T141729.682

परळी पुन्हा हादरली! हॉटेल व्यवसायिकाची धारदार शस्त्राने हत्या

बीड जिल्ह्यातील परळी  शहरात नवीन (Beed) अरुणोदय मार्केट परिसरात हॉटेल व्यवसायिक कारभारी आंधळे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतलं असून दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी आंधळे हे परळी येथील उड्डाण पुलाजवळ हॉटेल व्यवसाय करत होते. रोजच्या प्रमाणे ते रात्री आपले काम आटोपून गावाकडे निघाले होते. मात्र यावेळी नेहमीप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नसल्याचे सांगितले जात आहे. याच संधीचा फायदा घेत दोन हल्लेखोरांनी अरुणोदय मार्केट ते बस स्टँड रोडवरील मैदान परिसरात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

हल्लेखोरांनी कारभारी आंधळे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत असतानाच त्यांनी आपल्या मुलाला फोन करून घटनेची माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

धक्कादायक! नदी गायब करून दाखवला नाला; मंत्री पंकजा मुंडेच्या हस्तक्षेपाने थांबलं काम

घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, या हत्येमागे पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फिर्यादी ओमकेश कारभारी आंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आर्थिक व्यवहारातून हा वाद निर्माण झाला होता. या तक्रारीवरून परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत पहाटेच एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मात्र दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेनंतर परळी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यापारी वर्गात संतापाची भावना व्यक्त होत असून, मध्यवर्ती भागात अशा प्रकारची निर्घृण हत्या झाल्याने नागरिकांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, यामागे आणखी किती आरोपी सहभागी आहेत आणि आर्थिक व्यवहाराचा नेमका संबंध काय होता, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version