मोटेगावकरांच्या अटकेनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक; ‘आरसीसी’ क्लासेसच्या फलकांची तोडफोड
आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फलकांची तोडफोड करताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसी वादावादाही झाली.
नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी संघटना (Sambhajinagar) राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. मंगळवारी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियासह (एसएफआय), काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणवाडीतील आरसीसी क्लासेसवर धाव घेत क्लासेसच्या फलकांची तोडफोड केली. जोरदार घोषणाबाजी करत, पेपरफुटी प्रकरणा निषेध व्यक्त केला. खाजगी क्लासेसवर कायमस्वरूपी बंदी घाला एनटीए बरखास्त करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
देशपातळीवरील नीट पेपरफुटीमुळे रद्द झाली. सीबीआयने या प्रकरणी आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना अटक केली. पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. शहरात मंगळवारी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियासह (एसएफआय), काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आरसीसी क्लासेससमोर जोरदार निदर्शने केली. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी क्लासेसच्या फलकांची तोडफोड केली.
मुलाला डॉक्टर बनवण्यासाठीच फोडला; नीटचा पेपर? मोटेगावकरच्या घरात सापडली प्रश्नपत्रिका
क्लासेस बंद असल्याने क्लासबाहेर लावण्यात आलेले फलक, क्लासेसची माहिती देणारे, विद्यार्थ्यांची फोटो असलेले फलक कार्यकर्त्यांनी फाडले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फलकांची तोडफोड करताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसी वादावादाही झाली. यानंतर काहीवेळ परिसरात तणावही निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दीक्षा पवार, दिपाली पाटील, अरुण मते, मनीषा बल्लाळ, दिपाली कोरसे, सिध्दार्थ साळवे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, आयुष्याशी खेळणाऱ्या शिवराज मोटेगावकर यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करा, लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळवणाऱ्या अशा क्लासेसवर कारवाई करा, पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे कोकणवाडी परिसरात मोठी गर्दी जमली होती.
नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर व तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट, संबंधित अधिकारी व दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्यात यावी, रीक्षा घेण्यात वारंवार अपयशी ठरत असलेली एनटीए संस्था बरखात करण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, खाजगी क्लासेसवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.