Download App

सख्खा भाऊ पक्का वैरी! सुनील तटकरेंचं वर्चस्व मोडित काढण्यासाठी अनिल तटकरे शरद पवारांसोबत

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घरातूनच मोठा धक्का बसला आहे. तटकरे यांचे भाऊ आणि माजी आमदार अनिल तटकरे (Anil Tatkare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार राजेश टोपे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेशानंतर अनिल तटकरेंची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. (Former MLA Anil Tatkare has joined the NCP (SharadChandra Pawar) party.)

अनिल तटकरे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2010 ते 2018 असे आठ वर्षे ते आमदार होते. तर त्यांचा मुलगा अवधूत तटकरे हे श्रीवर्धन विधानसभेचे माजी आमदार आहेत. 2014 ते 2019 या काळात ते श्रीवर्धनचे आमदार होते. मात्र 2018 साली अनिल तटकरे यांना डावलत राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेचे तिकीट दिले. तर 2019 साली अवधूत तटकरे यांना डावलत सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून तिकीट दिले.

Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांच्या मनात शंका; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न सुटला तर..

त्यामुळे अनिल तटकरेंचे कुटुंब सुनील तटकरेंपासून दुरावले होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल आणि अवधूत तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने दोघेही नाराज झाले होते. पुढे ऑक्टोबर 2022 मध्ये दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जुलै 2023 मध्ये सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. त्यामुळे दोन्ही पिता-पुत्र पुन्हा नाराज झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते पवारांसोबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.

2017 मध्येही झाले होते कौटुंबिक कलह :

2017 मध्ये दोन्ही भावांमध्ये कौटुंबिक कलह निर्माण झाले होते. अनिल तटकरे यांचा दुसरा मुलगा संदीप तटकरे हे रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली. त्यामुळे संदीप यांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला होता. अनिल तटकरे यांनीही संदीप यांचा जाहीर प्रचार केला होता. पण निवडणुकीनंतर अवघ्या सहा मतांनी पोटफोडे विजयी झाले. तर संदीप तटकरे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. यामुळे दोन्ही भावांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. हा वाद इतका टोकाला गेला होता की थेट शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली होती.

प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अनिल तटकरे श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीचे उमेदवार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुनील तटकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रााहिले. शिवाय राज्यातील पक्षाची कमानही त्यांच्याच हाती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी अनिल तटकरे यांची थेट प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता ते श्रीवर्धन विधानसभेचे उमेदवारही असू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

follow us